esakal | कोरोना झालेल्या दांपत्यांचे हाल; ऑक्सिजनच्या शोधात ‘यूपी’ ते बंगाल प्रवास

बोलून बातमी शोधा

Oxygen Cylinder
कोरोना झालेल्या दांपत्यांचे हाल; ऑक्सिजनच्या शोधात ‘यूपी’ ते बंगाल प्रवास
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोलकता - श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने ऑक्सिजनच्या शोधात उत्तर प्रदेशमधील एक दांपत्य थेट पश्‍चिम बंगालला पोचले. उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेतून ८५० किलोमीटरचे अंतर १८ तासात कापत घेत या दांपत्याने बंगालला गाठले. यासाठी त्यांनी तब्बल साठ हजार रूपये खर्च आला.

‘यूपी’तील ५० व ४८ वर्षांच्या पती-पत्नीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी त्यांना खोकला व ताप होता. त्यामुळे श्‍वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता. त्यांनी अयोध्येतील १६ रुग्णालयांत चौकशी पण ऑक्सिजनअभावी त्यांना कोठेही दाखल करून घेण्यात आले नाही. निराश झालेल्या या दांपत्याने अखेर बंगालमधील चिनसुरा येथे राहणाऱ्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यांनी दांपत्याला बंगालला येण्याचा सल्ला देत तेथील खासगी रुग्णालयात दोन खाटांची व्यवस्था केली. यातील एका रुग्ण गंभीर असून दुसऱ्याची प्रकृती सुधारत असल्याचे अजंठा सेवा सदनचे मालक संजय सिन्हा यांनी सांगितले. उत्तर प्रदेशपेक्षा पश्‍चिम बंगालमधील परिस्थिती चांगली असल्याचे या दांपत्याच्या नातेवाइकांनी सांगितले.

हेही वाचा: 'जमत नसेल तर तसं सांगा, केंद्राकडे सोपवू'; कोर्टाने केजरीवालांना सुनावलं

रिकाम्या सिलिंडरचा तुटवडा

राज्यात रिकाम्या सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याने ऑक्सिजन उपलब्धतेवर परिणाम होत आहे. रिकामी सिलिंडर खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यास विलंब झाल्याने ही समस्या उद्भवली आहे, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली. ‘सेंट्रल मेडिकल स्टोअर’साठी नऊ हजार ते दहा हजार रिकामी सिलिंडरची खरेदी राज्य सरकार निविदेद्वारे करीत असते. पण २०१४-१५ या आर्थिक वर्षानंतर एकही निविदा प्रसिद्ध करण्‍यात आलेली नाही, असे सांगण्यात आले. आता निविदेची वाट न पाहता जेथून शक्य आहे तेथून रिकामी सिलिंडर खरेदी करण्याची सूचना आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

बांगलादेशी नागरिकांचे आंदोलन

भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्याने बांगलादेशने भारतातून येणाऱ्यांसाठी त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे कोलकत्यात उपचारासाठी येणारे शेकडो बांगलादेशी नागरिक भारतातील पेट्रोपोल सीमेवर अडकून पडले आहेत. त्यापैकी काहींचा वैद्यकीय व्हिसा संपला आहे तर अनेकांकडील अत्यल्प पैसे उरले आहेत. त्यामुळे बांगलादेश सीमा अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, पश्‍चिम बंगालमधील विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर घोष यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते माल्डा जिल्ह्यातील वैष्णवनगरमधून उभे होते.