CoronaVirus
CoronaVirus

कोरोना प्रवास महानगरांकडून गावांच्या दिशेने; यंत्रणेसमोर डोंगराएवढे आव्हान

नवी दिल्ली - जुलैच्या मध्याला संसर्गाचा उच्चांक गाठणाऱ्या कोरोनाचा प्रवास आता जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांकडून दुर्बल राज्ये, महानगरांकडून छोटी शहरे आणि ग्रामीण भागाकडे सुरू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रूग्णवाढीचा आकडा वेगाने वाढणाऱ्यांत आता महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू यांच्या बरोबरीने उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिशा, बिहार, राजस्थान या राज्यांचाही समावेश झाला आहे. देशागणिक रंगरूप बदलणाऱ्या व बरे झालेल्या अनेक रुग्णांना पुन्हा गाठणाऱ्या कोरोनाचा हा विचित्र प्रवास जुलै ते सप्टेंबरपर्यंतच्या संभाव्य सर्वाधिक प्रकोपाच्या काळात कसा होणार याबद्दल तज्ज्ञही साशंक आहेत. 

बाधित साडेआठ लाखांवर
कोरोनाचा देशभरातील संसर्ग वाढून रूग्णसंख्या साडेआठ लाखांच्या घरात पोचली असून १ लाखांपेक्षा जास्त रूग्ण असलेली राजधानी दिल्ली हे सलग आठवडाभर सक्रिय रुग्णसंख्येत तब्बल १८ टक्‍क्‍यांनी घट होणारे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोना निर्मूलनाची सूत्रे हाती घेतल्यावर व केजरीवाल सरकारने केंद्राशी सहकार्याची भूमिका घेतल्याने दिल्लीतील चित्र बदलत चालले आहे. 

अन्य राज्यांत वाढ
उत्तरप्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिशा, बिहार, राजस्थान या राज्यांत गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या ५० ते ८० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. दिल्लीत ३ जुलैला २६ हजार ३०४ एवढी सक्रिय रुग्णसंख्या होती. मागील चोवीस तासांत हाच आकडा २१ हजार ५७६ झाला आहे. या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील सक्रिय रुग्णसंख्या २१.७ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मागील आठवड्यात देशात सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांनी वाढली आहे. हरियाना व तमिळनाडूतही सक्रिय रुग्णसंख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झाली आहे. महाराष्ट्रात ती सरासरीइतकी झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ बरा नाही; अरविंद केजरीवालांचे मोदींना पत्र

सक्रिय रुग्णवाढ प्रमाण टक्क्यांत
कर्नाटक... ८९
आसाम-ओडिशा..८०
बिहार...६९
यूपी, राजस्थान..५०

म्हणून चाचण्या वाढविल्या
कर्नाटक वगळता इतर राज्यांत वैद्यकीय पायाभूत सुविधांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांचे निरीक्षण आहे. कोरोनाचा कहर असलेल्या राज्यांतही आता महानगरांकडून ग्रामीण भागाकडे संक्रमणाचा प्रवास सुरू होण्याचा कल हे अत्यंत काळजीचे कारण असल्याचे या मंत्रालयाचे म्हणणे आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद या शहरांकडून आता त्या त्या राज्याच्या इतर शहरांकडे, ग्रामीण व निमशहरी भागांकडे संसर्गाचा प्रवास सुरू झाल्याचे केंद्राकडे रोज जमा होणारी माहिती सांगते. खुद्द दिल्लीतील अनेक कोरोना रूग्णालयांची परिस्थिती भयावह असल्याचे वारंवार समोर आले आहे. या स्थितीत देशाच्या ग्रामीण भागांतील वैद्यकीय सुविधांची परिस्थिती काय असेल व केंद्रासह त्या त्या राज्य सरकारांसमोर केवढे मोठे आव्हान उभे राहात आहे, याचा विचार करावा लागेल असे मंत्रालय सूत्रांचे मत आहे. त्यामुळेच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यांना चाचण्यांची गती वाढविण्याची सूचना केली आहे.

आरोग्य संघटनेकडून धारावीचे कौतुक
जिनिव्हा : मुंबईतील कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला यश आले असून जागतिक आरोग्य संघटनेनेही सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस घेबरायसूस म्हणाले की, ‘‘जगात अशी असंख्य उदाहरणे आहेत की जिथे संसर्ग तीव्र असतानाही तो नियंत्रणात आणता आला. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि अगदी धारावी यांचासुद्धा आदर्श घेण्यासारखा आहे. धारावामध्ये तर लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. बाधितांचा शोध घेत त्यांच्या चाचण्या घेणे, विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करणे या माध्यमातून आपल्याला संसर्ग रोखता येऊ शकतो.’’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com