CoronaVirus : संकटकाळात भारत देणार चीनला मदतीचा हात

वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

  • संकटकाळात ड्रॅगनला भारताचा मदतीचा हात
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना पत्र

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या विरोधात लढत असलेल्या चीनला मदतीचा हात देण्यास भारत तयार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना मोदींनी पत्र लिहिले असून, त्यात मदतीची तयारी दर्शविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या विरोधात चीनने युद्ध छेडले असून, या पार्श्वभूमीवर चीनला मदत करण्यास भारताकडून तयारी दर्शविण्यात आली आहे.

अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

चीनमध्ये कोरोनामुळे गेलेल्या बळींना आपण आदरांजली वाहत असल्याचे पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोनाच्या आव्हानावर मात करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत सदैव चीनच्या पाठीशी आहे, असे मोदींनी पत्रात नमूद केले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

अध्यक्ष जिनपिंग आणि चिनी जनतेबद्दल मोदींनी पत्रात संवेदना व्यक्त केल्या आहेत. हुबेई प्रांतातील भारतीय नागरिकांना मागील आठवड्यात मायदेशी आणण्याच्या प्रयत्नांत केलेल्या सहकार्याबद्दलही मोदींनी जिनपिंग यांना धन्यवाद दिले आहेत.

अर्थव्यवस्थेवर अल्प परिणाम
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये चीनचे भारतातील राजदूत सून वेइडोंग यांनी स्पष्ट केले होते, की चीनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी भारताबरोबर काम करण्यास चीन तयार आहे. त्यासाठी द्विपक्षीय संवाद आणि सहकार्यात वाढ करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर अल्प काळासाठी परिणाम होऊ शकतो, हे मान्य करत वेइडोंग यांनी म्हटले आहे, की या संकटावर मात करण्यासाठी चीन पूर्णपणे सक्षम असून, त्यासाठी आवश्यक प्रमाणात स्रोत उपलब्ध आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus PM Modi writes to Xi Jinping offers assistance