esakal | देशात कोरोनाची गंभीर स्थिती; वाचा 7 महत्त्वाचे अपडेट्स 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus situation in india 7 important points

महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 22 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय तर, पाठोपाठ चेन्नईत 2 लाख 45 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

देशात कोरोनाची गंभीर स्थिती; वाचा 7 महत्त्वाचे अपडेट्स 

sakal_logo
By
रविराज गायकवाड

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी, 31 जुलै रोजी 24 तासांत सर्वाधिक 57 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 764जणांचा 24 तासांत मृत्यू झालाय. देशातील आजवरच्या रुग्णांची संख्या 16 लाखांच्या वर गेली असून, आतापर्यंत 10 लाख 94 हजारजण बरे झाले आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वाधिक कोरोना मृत्यू जुलैमध्ये
भारतात, 16 लाख नागरिकांना कोरोनाची लागण होण्याासाठी 183 दिवसांचा कालावधी लागला. आतापर्यंतच्या एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू केवळ जुलै महिन्यात झाले आहेत. तर 60 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण जुलै महिन्यात वाढले आहेत. 

तंत्रज्ञानाचा वापर
कोरोनाची चाचणी वेगाने होण्यासाठी भारत सरकार तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी इस्रायल सरकारची मदत घेण्यात येत आहे. श्वासोच्छवास आणि आवाजाच्या चाचणीतून कोरोनाचं निदान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रायल सरकारने दिली. 

आणखी वाचा - अयोध्येत लॉकडाउन स्थिती; बाहेरच्यांना प्रवेश बंदी

रुग्ण वाढीचा दर जास्त
भारतात रुग्ण वाढीचा दर 3.6 टक्के आहे. अमेरिकेत सध्या 1.6 टक्क्यांनी रुग्ण वाढत आहेत तर, ब्राझीलमध्ये 2.3 टक्क्यांनी रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारतात झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. 

सर्वाधिक फटका महाराष्ट्रात
महाराष्ट्रात कोरोनानं सर्वाधिक कहर केलाय. शुक्रवारच्या आकडेवारीत पुन्हा 24 तासांत 10 हजारांवर रुग्ण सापडले असून, एका दिवसात 265 जणांचा बळी गेलाय. महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 22 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय तर, पाठोपाठ चेन्नईत 2 लाख 45 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

आंध्र प्रदेशात वाढती संख्या
महाराष्ट्र, तमीळनाडूनंतर आंध्र प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात एकूण 30 हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत दीड लाखांवर नागरिकांना कोरोनाची लागण झालीय. त्यातील अनेकजण बरे होऊन घरी परतले आहेत. 

आणखी वाचा - महिला न्यूज अँकरची आत्महत्या

दिल्लीत वेगळा निर्णय
दिल्लीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी, तेथे अनलॉक-थ्रीमध्ये नवे नियम लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. दिल्ली सरकारने हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याला परवानगी दिलीय. एका आठवड्यासाठी प्रयोग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी 1 हजार 195 रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 1 लाख 35 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत 3 हजार 963 जणांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. 

अनलॉक3ची नियमावली जाहीर
देशात अनलॉक3ची नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून, लॉकडाउनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. नव्या नियमानुसार कंटेन्मेंट झोनच्या बाहेर जीम आणि योगासन वर्ग सुरू करण्याला परवानगी देण्यात आलीय.