esakal | लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा; केंद्राची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

ज्या राज्यांमध्ये परदेशी पर्यटकांचा वावर जास्त आहे, त्या राज्यांत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.

लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा; केंद्राची भूमिका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Coronavirus Update: नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. त्यामुळे विविध राज्यांनी मिनी लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यूसारखी पावले उचलली आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात येणार का? अशा चर्चांणा उधाण येऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. लॉकडाउन लावायचा की नाही, हा निर्णय आता राज्यांचा असणार आहे. राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असे शहा म्हणाले.

शहा पुढे म्हणाले की, गेल्या ३ महिन्यांपासून आम्ही राज्यांना निर्णय घेण्याबाबतचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक राज्यात कोरोनाची स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीनुसार राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. जेव्हा देशात पहिल्यांदा लॉकडाउन करण्यात आला होता, त्यावेळी आरोग्याच्या सेवा-सुविधांमध्ये खूप तफावत होती. बेड्स, ऑक्सिजन, कोरोना चाचणीच्या सुविधा यांची उपलब्धता नव्हती. आता त्यामध्ये बराच फरक पडला आहे. लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा, त्यांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.

हेही वाचा: ‘ट्रीपल टी’ : कोरोनाला रोखण्याचा 'जळगाव पॅटर्न'!

कुंभमेळ्याबाबत शहा म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याबाबत संत-महंतांशी संवाद साधला आहे. प्रतीकात्मक स्वरुपात कुंभमेळा साजरा केला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. १३ पैकी १२ आखाड्यांनी कुंभ समाप्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांची संख्या कमी होऊ लागली आहे. ज्या राज्यांमध्ये परदेशी पर्यटकांचा वावर जास्त आहे, त्या राज्यांत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. तसेच ज्या राज्यांमध्ये कुंभमेळा किंवा निवडणुका नाहीत, तेथेही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात कोरोनाचं तांडव, प्रत्येक तीन मिनिटाला एकाचा बळी

कोरोनाचा नवा म्यूटंट चिंताजनक

कोरोनाच्या नवा म्यूटंट आपल्याला किती धोकादायक वाटतो, या प्रश्नावर अमित शहा यांनी उत्तर देताना म्हटलं की, याबाबत प्रत्येकजण चिंतीत आहे. मला देखील याची चिंता वाटते. मात्र, आपले वैज्ञानिक या नव्या म्युटंटशी लढण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करत आहेत. मला विश्वास आहे की आपण जरुर जिंकू.

हेही वाचा: 'व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा'; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला फंडा!

नव्या लाटेमुळे परिस्थिती बिकट

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरत असून दररोज नवनवे रेकॉर्ड बनत चालले आहेत. सलग तीन दिवसांपासून देशात अडीच लाखाहून जास्त रुग्ण आढळून येत आहेत. एकाच आठवड्यात देशात १० लाखाहून अधिक कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली आहेत. दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांनी मिनी लॉकडाउन, वीकेंड लॉकडाउन, नाईट कर्फ्यू सारखे निर्णय घेतले आहेत. दिल्लीमध्ये वीकेंड लॉकडाउन, उत्तर प्रदेशमध्ये रविवारी लॉकडाउन, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये १५ दिवसांचा मिनी लॉकडाउन करण्यात आला आहे.