Congress : उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस; दिग्विजय सिंह यांच्यासह 'हे' 6 नेते रिंगणात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress President Election 2022

अशोक गेहलोत हे अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतील, असा अंदाज वर्तवला होता; पण..

Congress : उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस; दिग्विजय सिंह यांच्यासह 'हे' 6 नेते रिंगणात!

Congress President Election 2022 : अध्यक्षपदावरून सुरु असलेला काँग्रेसमधील गदारोळ आज (शुक्रवार) संपुष्टात येऊ शकतो. आज, 30 सप्टेंबर ही काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

दरम्यान, या शर्यतीत चार नेते सहभागी होऊ शकतात. त्यापैकी, G-23 गटाचे शशी थरूर हे पहिल्या स्थानावर आहेत, तर पक्षाचे निष्ठावंत दिग्विजय सिंह (Digvijay Singh), मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि कुमारी शैलजा ह्या देखील निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. आज हे दिग्गज आपला अर्ज दाखल करू शकतात. मात्र, पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिलाय.

हेही वाचा: Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला

अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतील, असा अंदाज सुरुवातीपासून वर्तवला जात होता. मात्र, ते अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता गेहलोत यांच्या जागी पक्षाचे दलित नेते मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ते उमेदवारी अर्ज भरणार की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीय. अशा स्थितीत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत रंजक होणार आहे.

हेही वाचा: Political News : 'विरोधी गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील'

गेहलोत यांना राजस्थान सोडायचं नव्हतं आणि ते अध्यक्ष झाल्यास मुख्यमंत्रीपदी कायम राहायचं होतं. त्यासाठी त्यांनी हायकमांडकडं अटही ठेवली होती. शिवाय, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि शेवटी त्यांनी हायकमांडच्या विश्वासाला तडा दिल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: Nipani Politics : अफवांवर विश्वास ठेऊ नका, मी विधानसभा निवडणूक लढवणार; काका पाटलांची मोठी घोषणा

मात्र, यादरम्यान अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही धोक्यात आली आहे. अशोक गेहलोत यांचा निर्णय बदलल्याने ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह रिंगणात उतरले आहेत. दिग्विजय सिंह आज उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असं मानलं जात आहे. याशिवाय आणखी काही नेत्यांची नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीत येत आहेत. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, मीरा कुमार, मुकुल वासनिक आणि कुमारी शैलजा यांचा समावेश आहे. यामध्ये मुकुल वासनिक यांच्या नावाची उच्चस्तरीय बैठकीतही चर्चा झाली. मात्र, ते यासाठी तयार नसल्याचं बोललं जात आहे.