‘बत्ती गुल’चे खापर राज्यावरच - आर. के. सिंह

rk-singh
rk-singh

नवी दिल्ली - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या १२ ऑक्‍टोबरला संपूर्ण महानगराचा वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्याने उडालेल्या हाहाकाराचे संकट चिनी सायबर हल्ल्यामुळे आले होते, ही राज्य सरकारने वर्तविलेली शंका केंद्र सरकारने समूळ खोडून काढली आहे. ‘‘मुंबईतील त्या ‘बत्ती गुल’ संकटामागे चीनद्वारे केलेल्या सायबर हल्ल्याचा हात असल्याचे  पुरावे केंद्राच्या तपासात मिळालेले नाहीत. हे संकट केवळ मानवी चुकीमुळेच उद्‍भवले होते,’’ असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी आज स्पष्ट केले. यातील सारा दोष स्थानिक यंत्रणेचा असल्याकडेही त्यांनी बोट दाखविले. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये उद्‍भवलेल्या वीजसंकटामागे चीनच्या हॅकरचा हात असू शकतो ही शंका न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्यांदा बोलून दाखविली होती. महाराष्ट्र सराकरनेही तिला दुजोरा दिला होता. त्याबाबतचा एक अहवालही काल राज्याच्या गृहमंत्र्यांनी सादर केला होता. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यातही या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने राज्यातील ते वीजसंकट सायबर हल्ल्यामुळे उद्‍भवल्याची शक्‍यता फेटाळली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंह यांनी सांगितले, ‘‘मुंबईतील वीजसंकटाच्या चौकशीसाठी केंद्राने दोन पथके तयार केली होती. दोन्ही पथकांचा अहवाल एकच समान निष्कर्षावर येऊन थांबतो की ते वीजसंकट कोणत्याही सायबर हल्ल्यामुळे नव्हे तर मानवी चुकीमुळे उद्‍भवले होते. देशावर सायबर हल्ला झाला आहे पण, त्याचा मुंबईतील वीजेचे ग्रीड निकामी होण्याशी काहीही संबंध नाही.’’ 

याबाबत राज्य सरकार १२ तारखेला याबाबत विधानसभेत सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सिंह यांचे ताजे वक्तव्य पाहता त्या अहवालानंतर केंद्र व राज्य सरकारांमधील परस्पर विरोधी भूमिका आणखी तीव्रपणे पुढे येतील अशी शक्‍यता आहे.

सायबर हल्ला अशक्य
नागपूर : ‘महाराष्ट्रातील पॉवर ग्रीड ‘मॅन्युअल’ असल्याने त्यावर सायबर हल्ला होणे शक्यच नाही. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री  नितीन राऊत हे चीनने सायबर हल्ला केल्याचे सांगून जनतेची फसवणूक करत आहेत,’ असा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. खोटे बोलणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

बावनकुळे म्हणाले की, एका आयपीएस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून चीनने हल्ला केल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. ‘न्यूयार्क  टाईम्स’ या वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा आधार त्यासाठी घेण्यात आला. मात्र त्याची कुठलीच खातरजमा केलेली नाही. बाहेरच्या देशावर आरोप करण्यापूर्वी केंद्राचा गृहविभाग, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी साधा संपर्क साधण्यात आला नाही. तसेच, चिनी सायबर हल्ल्याची खोटी माहिती मंत्र्यांनी दिल्याची तक्रार आपण केंद्राकडे करणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले. एक अधिकारी सांगतो आणि राज्यातील दोन मंत्री कपोलकल्पित अहवालावर डोळे लावून विश्वास कसे काय ठेऊ शकतात?, असेही बावनकुळे म्हणाले. ज्या आयपीएस अधिकाऱ्याने अहवाल तयार केला तो बोगस अहवाल तयार करण्यात पटाईत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

हे आहे मुख्य कारण 
बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी चार ग्रीड आहेत. त्यापैकी दोन आधीच बंद होत्या. तिसऱ्या वाहिनीवर अतिरिक्त भार आल्याने ती बंद करण्यात आली. त्यामुळे चौथ्या लाईनवर आणखीच भार वाढला. ठिणग्या उडायला लागल्याने ऑपरेटरने चौथी वाहिनी बंद केली. त्याची नोंदही आहे. वीज बंद होण्याचे हे मुख्य कारण आहे. प्रशासनाला योग्य प्रकारे वीतरण व्यवस्था हाताळता आली नाही. त्याचे खापर कोणावर तरी फोडण्यासाठी सायबर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले, असे ते म्हणाले.

सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविणारा अहवाल मिळाला आहे. त्यात राजकारण न करता उपाय योजनेच्या दृष्टीने काय करता येईल हे सर्वांनी पाहावे.या संदर्भात केंद्रीय ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली असून, सावध राहणे गरजेचे असल्याचे त्यांचे मत आहे.
- अनिल देशमुख, राज्याचे गृहमंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com