esakal | कोलकात्यात कोरोनाचा विस्फोट; दोन पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

Corona Test

कोलकाता शहर आणि आसपासच्या भागात कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये ४५ ते ५५ टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह येत आहेत.

कोलकात्यात कोरोनाचा विस्फोट; दोन पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

West Bengal Corona Updates : कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. आतापर्यंत ६ टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली असून २६ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी उर्वरित दोन टप्प्यांतील मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅली, मोर्चे, जाहीर सभा यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, ती आता खरी ठरताना दिसत आहे. कारण शनिवारी (ता.२४) पश्चिम बंगालमध्ये १४ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले असून ५९ जणांचा मृत्यूही झाला आहे. तेथील एकूण मृतांची संख्या १० हजार ८८४ वर पोहोचली आहे.

हेही वाचा: देशात कोरोनाचा उद्रेक; ‘ॲन्टिबॉडी’ घटल्याने फेरसंसर्गात वाढ

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने रविवारी (ता.२५) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. RT-PCR चाचणी केलेल्या प्रत्येकी दोन पैकी एका व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह येत आहे. तर संपूर्ण राज्यात प्रत्येकी चारपैकी एकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह येत आहे, अशी माहिती तेथील डॉक्टरांनीच दिली आहे.

कोलकाता शहर आणि आसपासच्या भागात कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये ४५ ते ५५ टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह येत आहेत. तर राज्याच्या इतर भागात हेच प्रमाण २४ टक्के इतके आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला हे प्रमाण फक्त ५ टक्के होते.

हेही वाचा: चिंता वाढवणारी आकडेवारी; भारतात आढळले जगातील सर्वाधिक रुग्ण

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी करण्यास टाळाटाळ

राज्य सरकारी दवाखान्यात काम करणारे डॉक्टर म्हणतात की, हा फक्त एक नमुना आहे. वास्तवात पॉझिटिव्हिटी रेट यापेक्षा खूप जास्त असेल. सौम्य लक्षणे असलेले आणि काहीच लक्षणे नसलेले लोक टेस्ट करण्यास टाळाटाळ करत आहेत. चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत, त्यामुळे चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सरकारी आकडेवारी सांगते...

पश्चिम बंगाल आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२१ रोजी बंगालमध्ये २७ हजार ७६६ चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी १ हजार २७४ जण पॉझिटिव्ह आढळले होते. तर गेल्या २४ तासात ५५ हजार ६० कोरोना चाचणअया घेण्यात आल्या. त्यापैकी १४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. पॉझिटिव्हिटी रेट ४.९ टक्क्यांवरून २५.९ टक्क्यांपर्यंत वाढलेला दिसून येतो.

हेही वाचा: अश्विनची IPL मधून माघार, कोरोनामुळे घेतला निर्णय

निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचना

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निवडणूक आयोगाने २२ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. रोड शो, पदयात्रा आणि मोर्चांवर बंदी घालण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जास्तीत जास्त ५०० लोक रॅलीत सहभागी होऊ शकतात असे आयोगाने म्हटले होते. पण राजकीय पक्षांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले. कोलकातामध्ये प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, डॉक्टरांनी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. याचे गंभीर परिणाम तेथील जनतेला भोगावे लागणार आहेत, हे यावरून दिसून येते.