167 वर्षांच्या इतिहासात रेल्वेची पहिल्यांदाच अशी अवस्था

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

कोरोनाचा फटका बसलेल्या रेल्वेला आपल्या १६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशा अर्थ संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

नवी दिल्ली, ता. १२ : लॉकडाउनमुळे गेले साडेचार महिने प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागलेल्या रेल्वेने यंदा पहिल्या तिमाहीत तब्बल १०६६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम तिकीट रद्द केलेल्या प्रवाशांना केवळ परताव्यापोटी दिली आहे व ही रक्कम तिकीट विक्रीच्या रकमेपेक्षा जास्त आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या रेल्वेला आपल्या १६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशा अर्थ संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र याच काळात मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात रेल्वेची परिस्थिती तुलनेने समाधानकारक दिसत आहे. 

प्रवासी वाहतूक २५ मार्चपासून बंद असलेल्या रेल्वेने येत्या ३० सप्टेंबरपर्यंत श्रमिक स्पेशल व विशेष गाड्या वगळता प्रवासी गाड्या बंदच राहतील अशी घोषणा नुकतीच केली. सध्या फक्त श्रमिक व विशेष प्रवासी रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. यंदा पहिल्या तिमाहीत रेल्वेला प्रवासी गाड्यांच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या तब्बल किमान ४० हजार कोटी रूपयांचा फटका बसला आहे.

हे वाचा - पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचं काम युद्धपातळीवर सुरू; आठवडाभरात रुग्णांच्या सेवेत!

माहितीच्या अधिकारात मागिलेल्या एका अर्जाच्या उत्तरात रेल्वेने म्हटले आहे, की २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२०) रेल्वेला अनुक्रमे उणे ५३१.१२ कोटी, १४५.२४ कोटी व ३९०.६ कोटी इतके उत्पन्न मिळाले.मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रेल्वेला अनुक्रमे ४३४५ कोटी, ४४६३ कोटी व ४५८९ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. अर्थात याच काळात रेल्वेच्या मालवाहतूक उत्पन्नाबाबत मात्र तुलनेने समाधानकारक परिस्थिती दिसत असून एप्रिलमध्ये ५७४४ कोटी, मेमध्ये ७२८९ कोटी व जूनमध्ये ८७०९ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

हे वाचा - 'आई कोण होती समजल्याशिवाय तुम्हाला कमला हॅरिस कळणार नाही', बहिणीने केली भावूक पोस्ट

खासगीकरणाबाबतच्या बैठकीला २३ उद्योगांची हजेरी 
खासगी तत्वावर प्रवासी गाड्या चालविण्याच्या प्रस्तावित योजनेअंतर्गत रेल्वेने बोलावलेल्या बैठकीत बम्बार्डियर, सिमेन्स व जीएमआरसह २३ उद्योगांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. प्रत्यक्ष लिलावापूर्वी झालेली या विषयावरील ही दुसरी बैठक होती. २०२३ पर्यंत सारी पूर्वप्रक्रिया पूर्ण करून १२ विभागांतील १०९ मार्गांवर १५१ प्रवासी गाड्या खासगी उद्योगांद्वारे चालविण्याच्या योजनेला रेल्वेने गती दिली आहे. यातून किमान ३० हजार कोटींची खासगी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. ताज्या बैठकीला भेल, कॅफ, मेधा ग्रुप, स्टर्लाईट, भारत फोर्ज, जेकेबी इन्फ्रास्र्टक्‍चर व तितागढ वॅगन्स लिमीटेड या प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time history in railway face problem