
रणनीतिक चर्चेचे नेतृत्व देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांचे कुटनीतिक सल्लागार इमॅन्यूएल बोन यांनी केले.
नवी दिल्ली- भारत आणि फ्रान्सने संरक्षण सहकार्याला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फ्रान्सने मेक इन इंडिया अंतर्गत राफेल लढाऊ विमाने आणि पँथर हेलिकॉप्टर्सचे उत्पादन भारतात करण्याची ऑफर दिली असल्याचे वृत्त 'हिंदुस्थान टाइम्स'ने दिले आहे. फ्रान्स राफेलचे 70 टक्के आणि पँथर हेलिकॉप्टर्सचे 100 टक्के उत्पादन भारतात करण्यास राजी झाले आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी हस्तांतर करण्यासही ते तयार आहेत. या प्रकरणाशी निगडीत व्यक्तींनी शनिवारी याची माहिती दिल्याचे 'हिंदुस्थान टाइम्स'ने म्हटले आहे.
नौदलासाठी मीडियम हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची योजना करत असलेल्या भारत सरकारला पँथर हेलिकॉप्टर्सचे भारतात उत्पादन करण्याची ऑफर पसंत पडेल. एअरबसचे AS565 MBe एक ऑल वेदर, मल्टी-रोल मीडियम हेलिकॉप्टर आहे. जे शिप डेक, ऑफशोर लोकेशन आणि लँड-बेस्ड साइट्सच्या ऑपरेशनसाठी बनवण्यात आले आहे.
हेही वाचा- धक्कादायक! भारतात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू
साऊथ ब्लॉकमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-फ्रान्सदरम्यान रणनीतिक चर्चेतून 9900 मेगावॅट जैतापूर न्यूक्लियर पॉवर प्लांटवरुन चर्चा पुढे सरकली आहे. रणनीतिक चर्चेचे नेतृत्व देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांचे कुटनीतिक सल्लागार इमॅन्यूएल बोन यांनी केले. बोन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, भारताने 6 एअरबस 330 मल्टी रोल ट्रान्सपोर्ट टँकर्स फ्रान्सकडून लीजवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, भारतीय लष्कराबरोबर संरक्षण तंत्रज्ञान शत्रू देशांना दिले जाऊ नये. यावर फ्रान्सने भारताला सांगितले की, संरक्षण क्षेत्रात त्यांचे पाकिस्तानबरोबरील संबंध अत्यंत तळाला गेले आहेत. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी एका दहशतवादी घटनेवरुन राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांच्यावर टीका केली होती.