
ज्ञानवापी प्रकरण: 1936 च्या ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या निकालाचं कनेक्शन समोर
वाराणसी : ज्ञानवापी मशिदीचा वाद वाढत असून वाराणसी जिल्हा कोर्टात आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर हा वाद पेटला होता. ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केलेल्या पाच महिलांनी सुप्रीम कोर्टासमोर १९३६ साली ब्रिटिश ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात १९३६ सालच्या ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या निकालाचं कनेक्शन समोर आलं आहे.
ज्ञानवापी मशिदीची संपूर्ण जमीन काशी विश्वनाथ मंदिराची असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर केला. त्यादरम्यान ब्रिटिश सरकारच्या ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. १९३६ मध्ये ब्रिटिश सरकारने मशिदीची जमीन वक्फची नाही म्हणत एका मुस्लीम व्यक्तीची याचिका फेटाळून लावली होती. त्या निकालाची जोड आता या प्रकरणाला देण्यात येत आहे. दरम्यान वाराणसीच्या अंजुमन इनझानिया मशीद व्यवस्थापन समितीने ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
याला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याचिकाकर्त्यांनी त्यांचे वकील विष्णू शंकर जैन यांच्यामार्फत "ब्रिटिश सरकारने ही जमीन मंदिराच्या मालकीची होती, कारण ती कधीही वक्फ मालमत्ता नव्हती, त्यामुळे मुस्लीम त्यावर दावा करू शकत नाहीत." असं सांगत १९३६ साली ब्रिटिश कोर्टाने दिलेल्या निकालाचा उल्लेख केला आहे.
हेही वाचा: औरंगाबादेत पाणीप्रश्न गंभीर; आठवड्यातून फक्त 45 मिनिटं पाणीपुरवठा
मुघल सम्राट औरंगजेबाने वाराणसीच्या काशी विश्वेश्वराचं मंदीर पाडण्यासाठी आदेश काढला होता. तत्कालीन राज्यकर्त्याने किंवा त्यानंतरच्या कोणत्याही शासकाने वादग्रस्त जमीन वक्फ करण्याचा किंवा ती जमीन कोणत्याही मुस्लीम संस्थेला सुपूर्द करण्याचा कोणताही आदेश काढला हे सिद्ध करणारे काहीही पुरावे समोरच्या याचिकाकर्त्याकडे नाहीत असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
दरम्यान "वक्फने निर्धारित केलेल्या जमिनीवरच मशीद बांधली जाते, ज्या ठिकाणी मशीद बांधली जाणार आहे त्या ठिकाणच्या संपत्तीवर बोर्डाचा कायदेशीर अधिकार असला पाहिजे. कोणत्याही मुस्लिमाने मंदिराच्या जागेवर बांधलेल्या बांधकामाला मशीद म्हणता येणार नाही" असा युक्तीवाद करण्यात आला आहे.
हेही वाचा: ...तरंच संभाजीराजेंचा मान शिवसेना ठेवू शकेल; दानवेंचा राऊतांना सल्ला
वक्फ काय आहे?
इस्लामला मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी देणगी दिली असेल तर त्याला वक्फ म्हणतात. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, मशिदी आदी संस्था येतात असं मुस्लीम तज्ञ सांगतात.
Web Title: Gyanvapi Mosque 1936 British Court Case Connection
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..