भारताच्या निर्णयाने बिथरला चीन, दिली जागतिक व्यापार संघटनेची धमकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

भारताने 59 चीनी अॅप्स बॅन केले आहेत. यामुळे हडबडलेल्या चीनने आता भारताला जागतिक व्यापार संघटनेच्या नावाने धमकी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनने आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचा दाखला दिला आहे.

नई दिल्ली- भारताने 59 चीनी अॅप्स बॅन केले आहेत. यामुळे हडबडलेल्या चीनने आता भारताला जागतिक व्यापार संघटनेच्या नावाने धमकी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनने आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचा दाखला दिला आहे. भारताच्या निर्णयाने चीनी कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना भारतासारखी मोठी बाजारपेठ जगात कुठेच मिळणार नाही. अशा परिस्थितीत भारताने घेतलेल्या निर्णयामुळे चीनची काळजी वाढली आहे. यामुळेच चीनने भारताला जागतिक व्यापार संघटनेच्या नावाने धमकी देण्यास सुरुवात केली आहे. 

अॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन बिथरला आहे. चीनने म्हटलं की, भारताचं हे पाऊल  जागतिक व्यापार संघटना आणि ई कॉमर्सच्या नियमांविरुद्ध आहे. भारतातील चीनच्या दुतावास प्रवक्त्यांनी सांगितलं की, भारताने जे पाऊल उचललं आहे ते गंभीर आणि काळजी करण्यासारखं आहे. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचा चीनकडून प्रखर विरोध केला जाईल. 

हे वाचा - कोरोनाचा चिनी अर्थकारणाला तडा

भारतातील चीनच्या दुतावासाचे प्रवक्ते जी रोन्ग यांनी म्हटलं की, भारताने जाणीवपूर्वक आणि भेदभाव करत काही चायनिज अॅप्सला काहीच विचार न करता हटवलं आहे. ही गोष्ट पारदर्शक प्रक्रियेला तडा जाणारी आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर संशयाच्या आधारे हे करण्यात आलं असून जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांविरुद्ध आहे. 

जागतिक व्यापार संघटनेचा नियम काय आहे?
अनेक आंतरराष्ट्रीय करारांच्या आधारावर जागतिक व्यापार संघटनेचे नियम तयार केले जातात. ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये वेळोवेळी गरजेनुसार सुधारणाही केल्या जातात. यामध्ये जागतिक व्यापार संघटनेचे काही मूलभूत नियम महत्वाचे ठरतात. यामध्ये भेदभाव विरहीत, मुक्त व्यापार, भविष्यातील शक्यता, आर्थिक विकासाला चालना देणे किंवा विकास यासारख्या बाबींचा समावेश असतो. एखादा देश कोणाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देत असेल तर जागतिक व्यापारी संघटनेच्या सिद्धांतानुसार त्यांना इतर सदस्य राष्ट्रांकडूनही त्याच प्रमाणात शुल्क आकारले पाहिजे. मात्र एखादा देश राष्ट्रहिताच्या पार्श्वभूमीवर एखादा निर्णय घेतो तेव्हा असा वाद सोडवण्यासाठी जागतिक व्यापारी संघटनेकडे धाव घेतली जाते. 

हे वाचा - PM मोदींनी त्यांच्या भाषणात बल्गेरियाच्या पंतप्रधानांचा उल्लेख का केला?

चीनला मोठा फटका
चिनी कंपन्यांना भारताच्या निर्णयाने हजारो कोटींचा फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या मते भारताच्या या निर्णयामुळे चिनी अॅप्स चालवणाऱ्या कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान झेलावं लागणार आहे. टिकटॉकवर बंदीमुळे कंपनीला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त दणका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर अॅप्सचा विचार केल्यास चीनला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज लावू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India banned Chinese apps could violate wto rules says china