भारताचा चीनला 'शॉक', आता आयातीवर घालणार बंदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहमध्ये अचानक भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीन बिथरले आहे. आता आणखी एक शॉक भारत सरकार चीनला देण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली - भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनला धक्का देण्यासाठी भारतात अनेक पावलं उचलली जात आहेत. भारताने चीनच्या 59 अॅपवर बंदी घालत त्याची सुरुवात केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहमध्ये अचानक भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीन बिथरले आहे. आता आणखी एक शॉक भारत सरकार चीनला देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंग यांनी संकेत दिले आहेत की, चीनकडून येणाऱ्या सर्व वीज उपरकणांच्या आयातीवर बंदी घातली जाईल. शुक्रवारी राज्यातील वीज आणि नवीकरणीय उर्जा मंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली.

आरके सिंग यांनी स्पष्ट केलं की, चीन आणि पाक्सितानकडून वीज उपकरणांच्या खरेदीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी मिळणार नाही. काही दिवसांपुर्वीच भारत सरकारने निर्णय घेतला होता की चीनमधून भारतात येणाऱ्या वीज उपकरणांची तपासीण होईल. कारण त्यामधून चीन मालवेअर, ट्रोजन हॉर्स यासारख्या व्हायरसच्या माध्यमातून सायबर हल्ला करू शकतो. ज्यामुळे भारतात इलेक्ट्रिसिटी ग्रीड फेल करण्याचा कटही रचला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. 

हे वाचा - भारताला किंमत चुकवावी लागेल; मोदींच्या लेह दौऱ्यानंतर चीनचा इशारा

आरके सिंग यांनी सांगितलं की, भारतात वीजेवर चालणाऱ्या उपकरणांची निर्मिती होत आहे. अशा परिस्थितीत परदेशातून माल मागवण्याची गरज नाही. जर कोणत्या साहित्याच्या आयातीची गरज असेल तर तीसुद्धा मर्यादित असेल. केंद्रीय मंत्र्यांनी काही दिवसांपुर्वी सांगितलं होतं की, त्यांना अशी माहिती मिळाली आहे की, वीजेवर चालणाऱ्या उपकऱणांमध्ये व्हायरस इन्स्टॉल केले जात आहेत. ते व्हायरस कोणत्याही ठिकाणाहून अॅक्टिव्ह केले जाऊ शकतात. 

हे वाचा - आणखी एका शेजाऱ्यानं भारताशी घेतला पंगा, निर्यात रोखली

केंद्रीय मंत्री आरके सिंग म्हणाले होते की, व्हायरसमुळे पूर्ण पॉवर सेक्टर उद्ध्वस्त केला जाऊ शकतो. यामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. उर्जा विभागाची संवेदनशीलता पाहता जी उपकरणे भारतात तयार होतात त्यांची देशातच खरेदी केली जाईल. याशिवाय जी उपकरणं भारतात तयार होऊ शकत नाहीत त्यांना आयात केलं जाईल. मात्र अशा उपकरणांची पूर्ण तपासणी करण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india banned on import power equipment from china syas union minister rk singh