esakal | भारतात कोरोनाचा उद्रेक; केंद्राने सीरमच्या लशीची निर्यात थांबवली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

सध्या जगभरात अनेक देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. भारतातही पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे.

भारतात कोरोनाचा उद्रेक; केंद्राने सीरमच्या लशीची निर्यात थांबवली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सध्या जगभरात अनेक देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. भारतातही पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एस्ट्राझेनकाच्या कोरोना लसीच्या निर्यातीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड ही लस भारतातून अनेक देशांना पुरवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाठिंब्याने GAVI अंतर्गत हा लशीचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये जगभरातील 180 हून अधिक देशांना लस पुरवण्याचे लक्ष्य आहे. भारताने जगातील अनेक देशांना 60 मिलियन डोसचा पुरवठा केला आहे. यातील 8.5 मिलियन डोस हे मदत म्हणून देण्यात आले आहेत. तर 34 मिलियन डोस कमर्शियल म्हणून दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 18 मार्चला नामीबिया आणि बोलिव्हिया यांना लस पाठवण्यात आली होती. भारताने निर्यात रोखल्यानं कोव्हॅक्सच्या सुविधेवर परिणाम होणार आहे.

इतर देशांना पुरवण्यात येणारी लस बंद करण्यात आलेली नाही मात्र सध्या निर्यात थांबवली आहे. लशींचा देशातील गरज किती याची माहिती घेतल्यानंतरच इतर देशांना पुरवठा करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. सरकारचे प्राधान्य देशातील नागरिकांना लसीकरण करणं हे आहे. देशातील लशीचं उत्पादन वाढलं असून कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा वापर आपत्कालीन परिस्थिती करण्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सरकार दोन महिन्यानंतर आढावा घेऊन देशातून लस निर्यात करण्याचा निर्णय़ घेणार आहे.

हे वाचा - कोरोनाची दुसरी लाट धोकादायक! २४ तासांत भारतात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद

भारतातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून केरळमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. तसंच राजस्थान पंजाबसह काही राज्यांनी केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणावर लशीची मागणी केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लशीची मागणीही वाढू शकते. 

हे वाचा - AstraZeneca ने ट्रायलदरम्यान जुनाच डेटा वापरला? अमेरिकेच्या एजेन्सीला शंका

याआधी केंद्र सरकारने 22 मार्चला कोविशिल्डबाबतच्या नव्या गाइडलाइन जाहीर केल्या होत्या. यानुसार कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे दोन आठवड्यापेक्षा जास्त असेल असं सांगितलं. आतापर्यंत दोन डोसमध्ये 4 ते 6 आठवडे अंतर ठेवलं जात होतं. नव्या आदेशानुसार हे अंतर 6 ते 8 आठवडे असू शकतं असं सांगण्यात आलं आहे. 

भारताने आतापर्यंत 76 देशांना लस पुरवली आहे. अनेक देशांना ही लस मोफत देण्यात आली असून काही देशांनी लस विकत घेतली आहे. यामध्ये श्रीलंका, भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमारचा समावेश असून जवळपास 56 लाख लशींचे डोस देण्यात आले आहेत. भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून लशींची निर्मीती करण्यात आली आहे. 

loading image