देशासाठी चिंतेची बाब! भारतात दर तासाला होते 'इतक्या' कोरोनाच्या रुग्णांची नोंद...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात संसर्ग पसरवला आहे. तर, भारतात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाच्या आकड्यांचे नवनवीन रेकॉर्ड समोर येत आहेत.

मुंबई : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात संसर्ग पसरवला आहे. तर, भारतात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाच्या आकड्यांचे नवनवीन रेकॉर्ड समोर येत आहेत. त्यातच भारताची चिंता वाढवणारी बाब समोर आली असून देशात दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 24 हजार 850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, कोरोनामुळे 613 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत भारतात 19 हजार 268 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. 

"मै लष्कर ए तोयबा से सुलतान बोल रहा हूँ"; ताज हॉटेलला आले धमकीचे २ फोन..पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

देशात कोरोनामुळे 24 तासांत मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. असं जरी असलं तरी एक दिलासादायक बाब म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगलं असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली आहे. त्यापैकी 4 लाख 09 हजार 083 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, भारतात कोरोना संसर्गातून बरे होण्याचा रिकव्हरी रेट 60 टक्क्यांवर पोहोचला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मते, 4 जुलै या दिवशी 2,48,934 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. देशात आतापर्यंत 97,89,066 लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

सलाम त्या योद्ध्यांना! सायन रुग्णालयातील २६ डॉक्टरांची कोरोनावर मात, पुन्हा सेवेत रुजू 

तर, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत ही सर्वाधिक वाढ झाली आहे. काल दिवसभरात राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 200064 वर गेली आहे. शनिवारी 295 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 8671 वर गेली आहे. तर, मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 83237 वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत 4830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सिडकोची 'स्वप्नपूर्ती' जलमय, खाजगी बिल्डरच्या बांधकामामुळे सोसायटीत घुसले पाणी

रशियालाही मागे टाकू शकतो भारत  
ही वाढलेली आकडेवारी पाहता भारत रशियालाही मागे टाकू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रशियातील रुग्णांची संख्या 6 लाख 74 हजार 515 इतकी आहे. त्यामुळे, भारतातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता भारत लवकरच रशियालाही मागे टाकू शकतो. त्यामुळे सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या देशाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. या यादीत अमेरिका पहिल्या (29 लाखांहून अधिक रुग्ण), त्या पाठोपाठ ब्राझील (15.5 लाख रुग्ण) दुसऱ्यास्थानी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india registers on thousands corona positive patients per hour, says health ministry