डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ठरले खोटारडे; भारताने दावा फेटाळला 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 मे 2020

डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारत चीन वादावर मोदींशी चर्चा झाल्याचा आणि सीमेवरील तणावामुळे त्यांचा मूड चांगला नसल्याचे खळबळजनक ट्विट केले होते.

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनशी असलेल्या तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मूड चांगला नाही, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, भारताने हा दावा खोडून काढला असून मोदींचे गेल्या काही दिवसांत ट्रम्प यांच्याशी बोलणेच झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे.

देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लडाखमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून चीनी सैन्याने भारतीय हद्दीत तीन किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली आहे. तसेच पाच हजाराहून अधिक सैनिकही तैनात केले आहे. या चीनच्या कृतीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला असून प्रत्युत्तरादाखल तेवढ्याच प्रमाणात सैनिक तैनात केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारत चीन वादावर मोदींशी चर्चा झाल्याचा आणि सीमेवरील तणावामुळे त्यांचा मूड चांगला नसल्याचे खळबळजनक ट्विट केले होते. १.४ अब्ज लोकसंख्या आणि मोठी लष्करी ताकद असलेल्या भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. भारत नाराज आहे आणि चीनही समाधानी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मी बोललो. चीनशी असलेल्या तणावामुळे ते चांगल्या मनस्थितीत नाहीत, असे या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले होते. परंतु, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्रांनी स्पष्ट केले, की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अलिकडे काहीही बोलणे झालेले नाही.

आणखी वाचा - बंगालमध्ये खुली होणार धार्मिक स्थळं; वाचा ममतादीदींचा निर्णय 

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी या तणावामध्ये मध्यस्थता करण्याचा प्रस्ताव पुढे करून खळबळ उडवली होती. दोन्ही देशांच्या संमतीनंतरच मध्यस्थी करण्याची तयारी ट्रम्प यांनी दर्शविली. मात्र भारतीय हद्दीत चीनच्या घुसखोरीबद्दल ट्रम्प यांनी काहीही भाष्य केले नव्हते. उलट तणावामध्ये मध्यस्थता करण्याची इच्छा व्यक्त करून ट्रम्प यांनी चीन प्रमाणेच भारतालाही एकाच तोलण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणकारांचे म्हणणे होते. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र संघानेही या मुद्द्यावर अंतर राखताना स्पष्ट केले होते, की कोणी मध्यस्थी करावी हा निर्णय दोन्ही पक्षांचा म्हणजेच भारत आणि चीनचा असेल.

आणखी वाचा - क्वारंटाईन सेंटरमध्ये तो खातो 40 चपात्या; 10 प्लेट भात

या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या प्रस्तावाची दखल घेणे भारताने टाळले आहे. सीमावादावर भारतीय सैन्यदळांचे वर्तन जबाबदारीचे असून द्विपक्षीय चर्चेतून तणाव कमी करण्याची दोन्ही देशांमध्ये व्यवस्था आहे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल भारताची भूमिका स्पष्ट केली होती. भारतातील चीनी राजदूत सून वेईडोंग यांनी भारत आणि चीनचा एकमेकांना धोका नाही, असा नरमाईचा सूर लावला असला तरी प्रत्यक्षात सीमेवर गालवान खोऱ्यात माघारीच्या चीनी सैन्याकडून कोणत्याही हालचाली नाही. तर, भारतानेही चीनी सैन्याच्या माघारीबाबत ठाम भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा - जिल्हाधिकारी ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री 

मोदी सरकार मौन का : राहुल गांधी 
चिघळेला सीमावाद आणि चीनी सैन्याची भारतीय हद्दीतील घुसखोरीवरून भारतात राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी सरकारला घेरताना या मुद्द्यावर मोदी सरकारच्या मौनामुळे तर्कवितर्कांना आणि अनिश्चिततेला उधाण आल्याचा आरोप केला आहे. नेमके काय चालले आहे यावर केंद्र सरकारने स्वतःहून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राहुल गांधींनी ट्विटद्वारे केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India rejects Modi trump discussion claim Donald trump twitter