जिल्हाधिकारी ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री; जाणून घ्या अजित जोगी यांचा रंजक प्रवास!

Chhattisgarh_CM_Ajit_Jogi
Chhattisgarh_CM_Ajit_Jogi

रायपूर : मध्यप्रदेश राज्यापासून वेगळं झाल्यानंतर छत्तीसगड राज्याचे राजकारण ज्या एका व्यक्तीभोवती फिरत राहिलं त्या व्यक्तीने आज जगाचा निरोप घेतला. २००० साली स्वतंत्र राज्य म्हणून छत्तीसगडची निर्मिती झाली, तेव्हा त्या भागात काँग्रेस बहुमतात होती आणि कोणतीच संधी न दवडता काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून अजित जोगी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. २००० ते २००३ पर्यंत जोगी यांनी राज्याचा राज्यकारभार पाहिला.

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या जोगींनी प्रतिष्ठित नोकरीला रामराम ठोकत राजकारणात प्रवेश केला. तत्कालिन परिस्थितीत जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे जोगी हे देशातील एकमेव उदाहरण आहेत. छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील एका कुटुंबात जोगी यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. १९६८ मध्ये ते आयपीएस झाले त्यानंतर दोन वर्षानंतर आयएएस ही झाले. त्यानंतर सलग १४ वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहण्याचा एक रेकॉर्डही जोगींनी आपल्या नावावर नोंदविला आहे.

राजकारणात येण्याआधी आणि त्यानंतरही जोगी कायम चर्चेत राहिले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जोगीवर खूप प्रभाव होता. भारतीय प्रशासकीय सेवेदरम्यान प्रोबेशन अधिकाऱ्यांच्या एका तुकडीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. तेव्हा इंदिरा गांधींनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले होते की, भारतात सत्ता फक्त तीनच लोकांच्या हातात आहे, डीएम, सीएम आणि पीएम. हा किस्सा जोगी वारंवार आपल्या मुलाखतींमध्येही सांगायचे. 

जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असताना जोगींची भेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी झाली आणि या भेटीमुळेच ते राजकारणात आले. १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत सक्रीय राजकारणात भाग घेतला. आणि १९८६ ते १९९८ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. तेव्हा त्यांनी काँग्रेसची विविध पदे भूषविली. त्यानंतर १९९८ मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून ते निवडूनही आले. 

छत्तीसगडमधील कॉंग्रेस बॅकफूटवर आल्यानंतर अजित जोगी यांची प्रकृतीही त्यांना दगा देऊ लागली. त्यामुळे हळूहळू ते सक्रिय राजकारणापासून दूर जाऊ लागले. मात्र, त्यांनी पक्षाशी नाळ घट्ट ठेवली. अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्तेत येऊ शकले नाही. बंडखोरी करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. शेवटी निराशेतून त्यांनी आपली वेगळी वाट निवडली. 

२०१६ मध्ये काँग्रेसमधून बंडखोरी करत त्यांनी 'जनता काँग्रेस छत्तीसगड' या नवीन पक्षाची स्थापना केली. तेव्हा देखील त्यांच्या पदरी निराशाच पडली. आणि २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यांना राजकारणातील आपला काळ संपल्याची चिन्हे दिसू लागली. आणि शुक्रवारी (ता.२९) वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com