लवकरात लवकर सैन्य माघारी घ्या; चीनला फटकारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and China

लवकरात लवकर सैन्य माघारी घ्या; चीनला फटकारले

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सीमावादावर (Border Dispute) तोडगा निघाला नसताना कोरोनाच्या संकटात लडाख सीमेवर सैन्य (Army) जमवाजमव आणि लष्करी सरावातून कुरापत काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला (China) आज भारताने (India) सीमेवरील शांततेखेरीज द्वीपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा शक्य नाही, असा सज्जड इशारा (Warning) दिला. तसेच सैन्यमाघारी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, असेही फटकारले. (India Warning to China Army Return Border Dispute)

परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सीमेवरील चीनी सैन्याची माघारी अद्याप पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ३० एप्रिलला चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याकडे लक्ष वेधले होते. या चर्चेचा संदर्भ देत प्रवक्ते बागची यांनी चीनला सैन्य माघारीची आठवण करून दिली. सीमेवर स्थैर्य राखण्याबाबत आणि तणाव वाढेल अशी कृती टाळण्याबाबत दोन्ही नेत्यांची सहमती झाल्याचा दाखला देताना बागची यांनी या सहमतीला प्रतिकूल ठरेल अशी कृती दोन्हीही बाजू करणार नाहीत, अशी अपेक्षा बोलून दाखविली. प्यॉंगयॉंग त्सो सरोवराच्या जवळ चीनने सैन्यकुमक आणून लष्करी सराव सुरू केल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता बागची यांनी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगितले. ज्या क्षेत्रात भारतीय लष्कर मागे हटले आहे, अशा ठिकाणी चिनी सैन्याचा सराव नाही, असे लष्करप्रमुखांनी म्हटले होते.

हेही वाचा: केरळच्या मंत्रीमंडळात 'राष्ट्रवादी पुन्हा!'; मिळालं मंत्रीपद

प्रवक्ते बागची काय म्हणाले

  • अनेक देशांकडून मिळणारी मदत रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून

  • लस उत्पादन सुरू करण्याबाबत अमेरिकेशी बोलणी

  • अन्य देशांमध्ये लस पाठविण्याच्या अमेरिकेच्या घोषणेची भारताकडून दखल

  • इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षावर आमसभेमध्ये निवेदन देणार

चीन-रशियादरम्यान अणु सहकार्य

बीजिंग : चीनमध्ये चार अणु प्रकल्पांच्या निर्मितीसाठी उभारण्यात येणाऱ्या सर्वांत मोठा अणुऊर्जा प्रकल्पाची काल चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्या हस्ते पायाभरणी झाली. सुमारे तीन अब्ज डॉलर खर्चाचा हा प्रकल्प असून प्रकल्पासाठी रशियाचेही सहकार्य मिळणार आहे. दोन्ही नेत्यांनी व्हीडिओ लिंकच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतला. दोन देशांमधील हा सर्वांत मोठा ऊर्जा सहकार्य प्रकल्प आहे. चीनमधील चारही प्रकल्पांमध्ये रशियन बनावटीच्या अणुभट्ट्या असतील.

loading image
go to top