रेल्वेनं घेतला मोठा निर्णय, जुलैमध्ये इंजिन धावणार नाहीच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

कोरोनामुळे देशात 26 मार्चला लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे वाहतुकही ठप्प झाली होती. रेल्वे ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता नाही.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात 26 मार्चला लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे वाहतुकही ठप्प झाली होती. आता रेल्वे कधी सुरु होणार याबाबत माहिती मिळाली नसली तरी 1 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीतीलसुद्धा ट्रेन्सचे तिकिट बूकिंग रद्द करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. म्हणजेच रेल्वे ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 1 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत कोणत्याही प्रवाशाने तिकिट बुकिंग केलं असेल त्यांना 100 टक्के पैसे परत दिले जातील. 

कोरोनावरील औषधावर पतंजलीचा अजब खुलासा; बातमी वाचाच

रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले की, या काळात केवळ स्पेशल ट्रेन रुळावर धावतील. यामध्ये मे आणि जून महिन्यात घोषणा करण्यात आलेल्या स्पेशल रेल्वेंचा समावेश आहे. जूनच्या सुरुवातीलाच रेल्वेकडून लॉकडाऊनमध्ये सुरू राहणाऱ्या 15 अप डाऊन कऱणाऱ्या ट्रेन्सची संख्या 200 केली होती. 

नव्या गाइडलाइन्सनुसार प्रवाशांना ट्रेन निघण्याआधी 90 मिनिटे स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला दिला होता. ज्या प्रवाशांकडे कन्फर्म्ड, RAC तिकिट असतील त्यांनाच स्टेशनमध्ये प्रवेश दिला जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक राहिल. तसंच ज्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळेल. 

बिहारमध्ये वादळाचा कहर! वीज कोसळून 83 लोक ठार

ट्रेनमध्ये सर्व प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल. पूर्ण प्रवासादरम्यान चेहऱ्याला मास्क लावावा लागेल. सर्व प्रवाशांना सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असेल. तसंच त्यांच्याकडे आरोग्य सेतु अॅप असणंही गरजेचं आहे. रेल्वे प्रत्येक विभागाा प्रत्येक स्टेशनवर प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळं गेट तयार करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian railwa cancelled tickets 1 jully to 12 august