हिंसाचाराची कालबद्ध चौकशी करा; राज्यसभेत विरोधकांची मागणी

rajyasabha
rajyasabha

नवी दिल्ली - २६ जानेवारीला १ लाख ९० हजारांपैकी जे २५-३० ट्रॅक्‍टर दिल्लीत आले त्यांना रस्ता कोणी दाखवला ? ज्यांनी जन्मात लाल किल्ला पाहिला नव्हता त्यांना तो कोणी दाखवला ? हे प्रश्‍न गंभीर असल्याने प्रजासत्ताकदिनाच्या हिंसाचाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समितीमार्फत कालबद्ध चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेत केली. 

राष्ट्रपती अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावेळी सरकार व विरोधकांमधील जुगलबंदी पुन्हा रंगली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (ता.८) चर्चेला उत्तर देण्याची व त्यावेळी मोठा गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. अजूनही राज्यसभेत स्पष्ट बहुमत नसलेल्या भाजपने खासदारांना, पुढील आठवड्यात संसदेत पूर्णवेळ हजर रहा असा तीन ओळींचा पक्षादेश जारी केला आहे. कृषी कायदे घटनात्मक कसोट्यांवर टिकणारे नाहीत असे, सांगून कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले की राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे नीरस व निराशाजनक प्रशस्तीपत्र आहे. वादग्रस्त कृषी कायद्यांची प्रशंसा राष्ट्रपतींना करायला लावणे अनावश्‍यक व गैर आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या राजधानीतील इंटरनेट ठप्प करणे आगळे व लाजिरवाणे उदाहरण आपण जगासमोर ठेवले आहे. शर्मा यांच्या भाषणावेळी माईक बंद होता त्यावर त्यांनी, "माईक बंद (कर दिया) है, लेकिन आवाज बुलंद है'' असा प्रहार केला. 

आनंद शर्मा म्हणाले, की कोरोनातील यशाचा उल्लेख करताना कोट्यवधी स्थलांतरित मजुरांच्या अनन्वित हालअपेष्टांचा अभिभाषणात एका शब्दानेही उल्लेख नसणे ही सरकारची असवंदेनशीलता निंदनीय आहे. ३० कोटी लोकांना व्यवस्थित लसीकरणासाठी ७ वर्षे लागतील, असे जागतिक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. कृषी कायदे व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय न करता, गर्विष्ठपणा बाजूला ठेवून आत्मचिंतन करा, चुगलखोर, चापलुसांपेक्षा निंदकांना जवळ करून टीका ऐकण्याची मानसिकता ठेवा व तीनही कृषी कायदे मागे घ्या, असेही आवाहन त्यांनी सरकारला केले. 

राऊत विचारतात, देशप्रेमी कोण? 
आमच्या देशात देशप्रेमी कोण आहे ? कंगना राणावत, की ज्याच्यामुळे एका निरपराध व्यक्तीला आत्महत्या करावी लागली तो एक अँकर अर्णव गोस्वामी ? त्याला तुम्ही आश्रय दिला त्याबद्दल तुम्हाला शरम वाटायला पाहिजे, अशा शब्दात संजय राऊत कडाडले. ते म्हणाले, की लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान करणारा दीप सिद्धू कोणाचा माणूस आहे हे जगाला माहिती आहे. आम्हा  राजकारण्यांवर टीका करा, पण केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या प्रकाश जावडेकर यांच्याबाबत हा अर्णव कसली भाषा वापरतो? बालाकोट हवाई हल्ल्यांबाबत त्याला आधीच माहिती कशी व कोठून मिळाली, या प्रश्‍नांचीही उत्तरे सरकारला द्यावी लागतील. या अर्णवला तुमचे संरक्षण. मात्र आपल्या हक्कासाठी लढणारा शेतकरी देशद्रोही ठरतो, असेही राऊत म्हणाले. सिंघू सीमेवर सत्य बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर देशद्रोहाचे गुन्हे भरले गेल्याचेही त्यांनी सांगितले. 

डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या युगाला मागे टाकून आत्मनिर्भरतेच्या विकासयात्रेत वेगाने अग्रेसर असलेल्या भारताचे अभिभाषणात दर्शन घडले. परिवर्तनाचा अनुशेष पूर्ण करायचा असेल तर आम्हाला विकासाचा वेग वाढवावा लागेल. 
- विनय सहस्रबुद्धे (भाजप) 

तुम्ही दुसऱ्यांदा पंतप्रधान झालात. आता कृषी कायदे मागे घेऊन, सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जाऊन सरदार पटेल यांच्याप्रमाणे ‘स्टेट्समन’ बनण्याची संधी नियतीने तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. ती वाया घालवू नका. 
- प्रतापसिंग बाजवा (काँग्रेस)

मराठा, जाट, क्षत्रिय व राजपूत या समाजांनाही आरक्षणाचे लाभ मिळावेत. 
- रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री)

राष्ट्रपती अभिभाषणावर बहिष्कार घालणे हे लोकशाहीविरोधी व घटनेचा अपमान करणारे.
- अनिल जैन (भाजप) 

अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा ‘छुपा अजेंडा’ हेच कायद्यांतील काळेबेरे आहे.
- बलविंदरसिंग भुल्लर (अकाली दल)

शेतकऱ्यांचे वीज पाणी तोडून व शौचालये बंद करून सरकारने मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन केले आहे. 
- सतीश मिश्रा (बसपा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com