
राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवरील 'फिदायीन' हल्ला सैनिकांनी हाणून पाडलाय.
नवी दिल्ली : गुरुवारी पहाटे जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात (Rajouri District) लष्कराच्या (Indian Army) छावणीवर 'फिदायीन' हल्ला सैनिकांनी हाणून पाडला. दहशतवाद्यांना (Terrorist Attack) त्यांच्या मनसुब्यात यश आलं असतं, तर मोठ्या संख्येनं जवान शहीद झाले असते. मात्र, या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले असून, त्यापैकी तीन जवान शहीद झाले आहेत. मात्र, चार तास चाललेल्या चकमकीत जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मूचे पीआरओ (संरक्षण) लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद (Devender Anand) यांनी सांगितलं की, राजौरीतील परघलमधील लष्कराच्या सतर्क जवानांनी 'फिदायीन' हल्ला हाणून पाडला. यापूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी दक्षिण काश्मीरमधील लेथपोरा, पुलवामा (Pulwama) इथं झालेल्या फिदायीन हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले होते.
कर्नल आनंद पुढं म्हणाले, खराब हवामान आणि झाडांच्या आडून दोन संशयित लष्कराच्या चौकीजवळ पोहोचले होते. इथं जवानानं त्यांना येण्याचं कारण विचारलं. परंतु, दोघांनीही चौकीत घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यादरम्यान सैनिकांनी परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांना आव्हान दिलं. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. इथं झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले. या फिदायीन हल्ल्यात आर्मीचे सुभेदार राजेंद्र प्रसाद (राजस्थान), रायफलमन लक्ष्मण डी (तामिळनाडू) आणि रायफलमन मनोज कुमार (हरियाणा) हे शहीद झाले.
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांना आमचा सलाम आहे. त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी आणि कर्तव्यनिष्ठेसाठी राष्ट्र त्यांचं सदैव ऋणी राहील. राजौरी पट्ट्यात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींबाबत गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आलं. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. एका ट्विटमध्ये सिन्हा म्हणाले, "आम्ही राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो." नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या हल्ल्याचा निषेध केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.