
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दिल्लीत जिथं रहायचे ते आलिशान निवासस्थान ११०० कोटी रुपयांना विकण्यात आलंय. भारताच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान राहिलेली ही इमारत दिल्लीत सध्याच्या मोतीलाल नेहरू मार्गावर आहे. स्वातंत्र्याची पहाट आणि फाळणीचं दु:ख पाहिलेल्या इमारतीची विक्रमी किंमतीत विक्री झालीय. दिल्लीत लुटियन्स बंगला झोन परिसरात नेहरूंचं हे निवासस्थान होतं. सध्या मोतीलाल नेहरू मार्ग नावाने ओळखला जाणाऱ्या रस्त्याचं आधीचं नाव यॉर्क रोड असं होतं. याच यॉर्क रोडवर हे निवासस्थान होतं. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री देश स्वातंत्र्याची उत्सुकतेनं वाट बघत असताना पंडित जवाहरलाल नेहरू याच निवासस्थानाहून तेव्हाच्या व्हॉइसरॉय हाउसकडे (सध्याचे राष्ट्रपती भवन) गेले होते.