राजकारणात फसला रणनीतिकार; प्रशांत किशोर यांना बाहेरचा रस्ता

वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

  • राजकारणात फसलेला रणनीतिकार
  • पीकें'नी पक्ष आणि पद दोन्ही गमावले

पाटणा : बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीत 2018 साली नितीशकुमारांच्या प्रचाररथाचे सारथ्य करीत त्यांना पुन्हा सत्ताधीश बनविणाऱ्या प्रशांतकिशोर (पीके) यांच्यावर आज संयुक्त जनता दलातून (जेडीयू) बाहेर पडण्याची वेळ आली आहे. कधीकाळी ज्या नितीश यांनी "पीकें'च्या राजकीय कौशल्याचे कौतुक करीत त्यांना डोक्‍यावर घेतले, त्याच नितीश यांनी आज "पीकें'ना बाहेरचा रस्ता दाखविला. प्रशांतकिशोर यांच्या रणनीतीची चुणूक 2014 मधील मोदी लाटेच्या वेळी पाहायला मिळाली होती. यानंतर पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी नितीश यांच्यासोबत मैत्री केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुढे 2015 मध्ये बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, जेडीयू आणि कॉंग्रेस यांच्या महाआघाडीचा प्रचार झंझावात उभा करण्याचे श्रेय "पीकें'नाच जाते. या निवडणुकीमध्ये भाजपला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. नितीश यांनी पुन्हा मुख्यमंत्री होताच प्रशांतकिशोर यांना बक्षीस म्हणून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. प्रशांतकिशोर यांच्या आगमनानंतर "जेडीयू'मधील अनेक जुने नेते अडगळीत पडले. त्यामध्ये आर. सी. पी. सिंह आणि लल्लन सिंह यांचाही समावेश होता. याचदरम्यान "जेडीयू'चे लालूंच्या राष्ट्रीय जनता दलासोबतचे संबंध तुटले. पण, त्याचा कसलाही परिणाम नितीश आणि पीके यांच्या मैत्रीवर झाला नाही.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

सिंहांची शहांशी मैत्री
प्रशांतकिशोर यांनी 2018 मध्ये अधिकृतरीत्या "जेडीयू'मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले होते. नितीश यांच्यानंतर पक्षात "पीकें'चे स्थान निर्माण झाले होते. प्रशांतकिशोर हे भवितव्य असल्याचे जाहीर वक्तव्य नितीश यांनी केल्यानंतर "जेडीयू'मधील अनेक नेतेमंडळी अस्वस्थ झाली होती. पुढे तर "पीकें'नी पक्षातील नेत्यांच्या बैठकाही घ्यायला सुरुवात केली. नितीश यांच्यापाठोपाठ "पीकें'च्या घरीही नेतेमंडळी जमू झाली. याच काळात "जेडीयू'मध्ये बाजूला पडलेले आर. सी. पी. सिंह आणि लल्लन सिंह यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले. आर. सी. पी. सिंह यांनी दिल्ली भाजपमध्ये लॉबिंग करीत अमित शहांसोबत मैत्री प्रस्थापित केली.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

....तरीही मिळाले स्थान
हे सगळे घडत असतानाच प्रशांतकिशोर यांनी थेट पक्षाचे नेते नितीश यांच्यावरच निशाणा साधला. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत काडीमोड घेतल्यानंतर नितीश यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता स्थापन करण्याऐवजी निवडणुकीला सामोरे जायला हवे होते, असे विधान त्यांनी केले. हे विधान नितीश यांच्या जिव्हारी लागले. यानंतरही उभय नेत्यांमधील संबंध पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षी पक्षाच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत "पीकें'ना नितीश यांच्या शेजारी स्थान मिळाले होते.

INDvsNZ : तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची सुपर ओव्हरमध्ये बाजी

...म्हणून पडली विकेट
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र नितीश यांनी पीकेंना जाणीवपूर्वक बाजूला ठेवत आर. सी. पी. सिंह यांना जवळ केले. लोकसभेसाठी जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी नितीश यांनी आर. सी. पी. सिंह यांच्या माध्यमातून अमित शहांसोबत बोलणी सुरू केली होती. यामुळे मुख्य प्रक्रियेतून पीके आपोआप बाजूला पडले. पुढे लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा नितीश यांनी सिंह यांच्याकडे सोपविली. नागरिकत्व कायद्यावरून "जेडीयू' भाजपच्या पाठीशी उभा राहिला असताना "पीकें'नी मात्र त्याविरोधात विधाने केली. पुढे हा वाद वाढत गेला आणि त्यातून "पीकें'ची राजकीय विकेट पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JD(U) expels Prashant Kishor