झारखंडचे नियोजित मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत तरी कोण?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

प्रतिकूलतेशी सामना करत झारखंडचे नेतृत्व करण्यासाठी हेमंत सोरेन यांनी बांधलेल्या महागठबंधनला मिळालेले यश त्यांच्या कार्याची पावती आहे. गुरुजी शिबू सोरेन यांचे पुत्र असले, तरी त्यांच्या कारकिर्दीच्या छायेबाहेर पडत त्यांनी स्वतःचे राजकीय विश्‍व निर्माण केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतिकूलतेशी सामना करत झारखंडचे नेतृत्व करण्यासाठी हेमंत सोरेन यांनी बांधलेल्या महागठबंधनला मिळालेले यश त्यांच्या कार्याची पावती आहे. गुरुजी शिबू सोरेन यांचे पुत्र असले, तरी त्यांच्या कारकिर्दीच्या छायेबाहेर पडत त्यांनी स्वतःचे राजकीय विश्‍व निर्माण केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि तीनदा मुख्यमंत्री राहिलेले शिबू सोरेन यांचा पुत्र हेमंत आता झारखंडचे मुख्यमंत्री होतील, हे जवळजवळ निश्‍चित आहे. अर्जुन मुंडा यांच्या सरकारात ते उपमुख्यमंत्री; तसेच झारखंडचे मुख्यमंत्रीही होते. झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांची मोट बांधण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि याच आघाडीने सत्ताधारी भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखले. शिबू आणि रूपी सोरेन यांच्यापोटी हेमंत यांचा 10 ऑगस्ट 1975 रोजी रामगड जिल्ह्यात जन्म झाला. पाटणातील एम. जी. हायस्कूलमधून 1990 मध्ये मॅट्रिक झालेल्या हेमंत यांनी रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीध्ये (मेसरा) मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला; पण ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. कल्पना यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर उभयतांना दोन मुलगे झाले. 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून 'ही' नावे निश्चित

वडील गुरुजी शिबू सोरेन यांच्यासारखा त्यांचा राजकीय नेता असा पिंड नाही किंवा निवर्तलेले भाऊ दुर्गांसारखेही त्यांचे व्यक्तिमत्त्व नाही. हेमंत 23 डिसेंबर 2009 रोजी डुमकातून आमदार झाले. तथापि, त्याआधी 2005 मध्ये त्यांना डुमकामधून पक्षातीलच बंडखोर स्टिफन मरांडींनी पराभवाची धूळ चारली होती. दुर्गा हेच शिबू सोरेन यांचे वारसदार मानले जायचे, तथापि दुर्गा यांच्या निधनानंतर हेमंत यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली आणि 2009 मध्ये ते पक्षात वरिष्ठ पातळीवर पोचलेदेखील. 
24 जून 2009 रोजी हेमंत राज्यसभेचे अल्प काळासाठी सदस्य झाले. 4 जानेवारी 2010 रोजी त्यांनी सदस्यत्वाची सूत्रे खालीही ठेवली. ते 11 सप्टेंबर 2010 रोजी झारखंडचे उपमुख्यमंत्री झाले, 8 जानेवारी 2013 पर्यंत याच पदावर राहिले. नियोजन आणि विकास, गृह, मंत्रिमंडळ समन्वय, माहिती आणि जनसंपर्क, प्रशासकीय सुधारणा व राजभाषा, कायदा आणि इतर खात्यांचा कारभार पाहात त्यांनी आपले राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तिमत्व आकाराला आणले. राष्ट्रपती राजवट मागे घेतल्यानंतर 13 जुलै 2013 रोजी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या मदतीने हेमंत झारखंडचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. डिसेंबर 2014 पर्यंत ते या पदावर राहिले. 

भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

सत्तेपासून दूर गेल्यानंतर त्यांना झारखंड मुक्ती मोर्चांतर्गत आव्हानांनाही तोंड द्यावे लागले. नेतृत्वाला आव्हान देण्याचा झालेला प्रयत्नही त्यांनी कुशलतेने मोडीत काढला. झारखंडमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हेमंत यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) (जेव्हीएम-पी) अशी मोट बांधून महागठबंधन यशस्वी केले. राज्य विधानसभेच्या निवडणुकीत हेमंत यांनी रघुबरदास यांच्या धोरणांना विरोधाची धार प्रचारात अधिक प्रखर केली. शिक्षकांच्या नोकरीचे प्रश्‍न, आदिवासींबाबतचा भाडेपट्टा करार, दारूची सर्रास विक्री, सरकारी शाळांचे विलीनीकरण याला विरोध दर्शवला. त्याचे फळ म्हणून त्यांच्या महागठबंधनच्या झोळीत मतदारांनी मतांचे माप टाकत हेमंत यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग सोपा केला. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand elections: Who is Hemant Soren?