Video:जेएनयूच्या विद्यार्थीनीचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ 

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 27 जानेवारी 2020

आरिफा फातिमा हिने आपण शाहीनबागेत हे वक्तव्य केलेले नव्हते, असा दावा केला आहे. शाहीनबागेतील निदर्शकांतर्फेही ही तरुणी किंवा शेरजील यांच्याशी या निदर्शनांचा काहीही संबंध नाही व हे व्हिडिओ या ठिकाणचे नाहीतच, असे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : देशाला पुन्हा एकदा तोडण्याची भाषा करणाऱ्या शेरजील इमाम याच्यापाठोपाठ एका तरुणीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यात ती सर्वोच्च न्यायालयाला दोषी ठरवतानाच अफजल गुरूला निर्दोष म्हणते. इतकेच नव्हे तर, "आमचा इथल्या सरकारवर, भारताच्या व्यवस्थेवर विश्‍वासच नाही,' असे सांगून टाळ्या मिळवतानाही दिसत आहे. भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी हा व्हिडिओ आज सकाळी ट्‌विट केला व हे शाहीनबागेतील "सुविचार' आहेत, असाही दावा केला. यामुळे देशात सुरू असलेल्या निदर्शनांच्या हेतूवरून नवा वाद सुरू झाला आहे. नव्या व्हिडिओत चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या तरुणीचे नाव आरिफा फातिमा असल्याचे समजले असून, ती जेएनयूची समाजशास्त्राची विद्यार्थिनी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्हिडिओनंतर भाजप आक्रमक
पात्रा यांनी व्हिडिओ ट्‌विट करताना लिहिले की, ""त्या नापाक शेरजीलपाठोपाठ या बाईसाहेबांचे म्हणणे जरा ऐका - आम्हाला कोणावर विश्‍वास नाही. सर्वोच्च न्यायालयावरही विश्‍वास नाही. अफजल गुरू निर्दोष, रामजन्मभूमीवर मशीद बनणे आवश्‍यक होते. मित्रांनो, इतकी विषाची शेती गेल्या काही दिवसांत तर उगवली नसणार ना?'' दरम्यान, भाजप असे व्हिडिओ सध्या रोज प्रसारित करीत आहे. मात्र, सत्ता हातात असलेले याच पक्षाचे सरकार संबंधितांना पकडत का नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधाच्या नावाखाली शाहीनबाग व इतरत्र सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये देशाच्या विरोधात गरळ ओकून लोकांना भडकविण्याचे काम होत आहे व त्याबाबत निदर्शनांत सामील होणाऱ्यांना जागरूक करणे हाच भाजपचा उद्देश आहे. 

आणखी वाचा - या तारखेपर्यंत होणार एअर इंडियाचा लिलाव

आणखी वाचा - विधानपरिषदच रद्द; या राज्याने घेतला मोठा निर्णय 

शाहीनबागेशी संबंध नसल्याचा दावा 
आरिफा फातिमा हिने आपण शाहीनबागेत हे वक्तव्य केलेले नव्हते, असा दावा केला आहे. शाहीनबागेतील निदर्शकांतर्फेही ही तरुणी किंवा शेरजील यांच्याशी या निदर्शनांचा काहीही संबंध नाही व हे व्हिडिओ या ठिकाणचे नाहीतच, असे स्पष्ट केले आहे. पात्रा यांनी हा व्हिडिओ शाहीनबागेतलाच असल्याचे म्हटले. यात ही तरुणी संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू हा संपूर्ण निर्दोष होता, असे म्हणताना दिसते. ""आज समजून येते, की संसदेवरील हल्ल्यात अफजलचा काहीही हात नव्हता. न्यायालय आधी म्हणते की, बाबरी मशिदीच्या खाली कोणतेही मंदिर नव्हते. मशिदीचे कुलूप तोडणे चुकीचे होते, मशीद पाडणे चुकीचे आहे व आज तेच म्हणते की, येथे मंदिर बनेल,'' असे फातिमाने म्हटल्याचा हा व्हिडिओ आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jnu student controversial video social media sambit patra twitter