काँग्रेसला रामराम ठोकत कंगनाच्या आईचा भाजप प्रवेश!

Kangana_Asha_Ranaut
Kangana_Asha_Ranaut

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमधील द्वंद्व चांगलेच चर्चिले गेले आहे. कंगनाच्या समर्थनार्थ अनेकजण पुढे आले, त्यामध्ये राजकीय पक्षांचाही सहभाग होता. मुळची हिमाचल प्रदेशची असलेल्या कंगनाला हिमाचल प्रदेश सरकारनेही जाहीर पाठिंबा दर्शविला. कंगनाच्या समर्थनार्थ भांबलामध्ये मोर्चाही काढण्यात आला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर कंगनाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधल्याने हिमाचलमध्ये अनेक राजकीय चर्चांना उधाण आले. कंगनाची आई आशा राणावत या भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे पक्षात स्वागत आहे, असे म्हणत हिमाचल प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी अगोदरच पायघड्या घातल्या. त्यानंतर मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची निवासस्थानी भेट घेतल्यानंतर कंगनाच राजकारणात उतरणार की काय अशी चर्चा सुरू झाली. मात्र, यावेळी कंगनाच्या आईने माध्यमांशी संपर्क साधत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

कंगनाची आई आशा राणावत म्हणाल्या, ''महाराष्ट्र सरकारने केलेले काम अत्यंत निंदनीय आहे. याचा मी तीव्रपणे विरोध करते. संपूर्ण देश माझ्या मुलीबरोबर आहे, याचा मला आनंद आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे की, ती नेहमी सत्यवादी होती आणि यापुढेही राहील." यावेळी आशा राणावत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आम्ही काँग्रेस समर्थक असल्याचे माहीत असूनही त्यांनी कंगनाला वाय-प्लस सुरक्षा पुरवत तिला संरक्षण दिले. 

यावेळी बोलताना आशा राणावत यांनी मोदी सरकार आणि जयराम सरकारचेही मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या की, ''आमचे कुटुंब बऱ्याच दिवसांपासून कॉंग्रेस समर्थक होते. कंगनाचे आजोबा स्व. सरजू राम हे मंडी जिल्ह्याच्या गोपाळपूर मतदारसंघातून कॉंग्रेसचे आमदार झाले होते. आता मोदी सरकारने आमचे मन जिंकले आहे. त्यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपमय बनलो आहोत.''

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com