शिकण्याची आस : तिनं कौलांवर शोधला शिकण्याचा मार्ग, तुम्ही कोणतं कारण देताय?

namitha narayan
namitha narayan

कोट्टकल, ता. 05 : शिकण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीत शिकता येतं याची प्रचिती देणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केरळमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा हा फोटो चर्चेत आहे. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. यात प्रामुख्यानं रेंजची समस्या आहे. तर काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नाही. मात्र या सगळ्यावर मात करत केरळमध्ये बीए इंग्रजीचे शिक्षण घेणाऱ्या नमिता नारायणने ऑनलाइन क्लासला हजेरी लावली. केरळमध्ये 1 जूनपासून ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत. 

केरळमध्ये कोट्टकलजवळ राहणाऱ्या नमिता नारायण हिच्या घरी नेटवर्कची समस्या होती. त्यासाठी तिने थेट कौलारू घराच्या छतावर रेंज शोधली आणि जिथे नेटवर्क नीट आले तिथे बसून ऑनलाइन क्लासला हजेरी लावली. अरीक्कलमध्ये तिचं घर असून तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर घरामध्ये रेंज मिळेल अशी सोय एका खाजगी सर्व्हिस प्रोव्हायडरनं केली आहे. 

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार नमिताला ऑनलाइन क्लास जॉइन करता येण्यासाठी आवश्यक नेट स्पीड फक्त घराच्या छतावरच मिळाले. त्यानंतर कंपनीच्या टेक्निकल स्टाफने तिच्या घरी जाऊन इंटरनेटला नीट रेंज मिळेल अशी व्यवस्था केली आहे. त्यानंतर नमिताने तिच्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, मी आनंदी आहे आता मला घरात बसूनच शिकता येईल. नेटवर्क ऑपरेटरकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल तिने कंपनीचे आभारही मानले. नमिता बीए इंग्लीशचे शिक्षण घेत असून ती तिसऱ्या वर्षात शिकत आहे. 

नमिता यावेळी छतावर छत्री घेऊन बसल्याचं दिसतं. नमिताने सांगितलं की, पावसाची अडचण नव्हती पण वीज वाऱ्याचा धोका होता. माझ्या प्रमाणे इतरही अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले नेटवर्क मिळत नाही. त्यावेळी ते वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करतात. 

अभ्यासासाठी छतावर का जाऊन बसावं लागलं याबद्दल सांगताना नमिता म्हणाली की, मी घरातील बऱ्याच ठिकाणी रेंज शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी छतावर बऱ्यापैकी नेट कनेक्ट होईल अशी रेंज मिळाली. त्यामुळेच ऑनलाइन क्लासवेळी छतावर बसून अभ्यास केला असं नमिताने सांगितलं. 

कोट्टकलचे आमदार सय्यद अबिद हुसेन यांनी नमिताच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर सय्यद यांनी सांगितले की, नमिताचा छतावर बसून अभ्यास करत असलेला फोटो आता राज्यातील नेटवर्कचं प्रतिक बनला आहे. तर नमिता राज्यातील विद्यार्थ्यांची जिद्द आणि त्यांच्यातील चिकाटीचं प्रतिक ठरली आहे. ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनली असल्याचंही आमदार सय्यद यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com