मध्य प्रदेशात ट्विस्ट; ज्योतिरादित्यांवर पाठिंब्यासाठी फसवून सह्या घेतल्याचा आरोप

madhya pradesh congress crisis kamalanath camp still claims for numbers
madhya pradesh congress crisis kamalanath camp still claims for numbers

भोपाळ : मध्य प्रदेशात सकाळपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये संध्याकाळी वेगळाच ट्विस्ट आला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला लांबून 'हात' दाखवल्यानंतर, कमलनाथ सरकार अडचणीत असल्याचं दिसत होतं. पण, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सायंकाळी बोलवलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला 94 आमदार उपस्थित राहिल्यानं कमलनाथ सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. कमलनाथ सरकारकडून अजूनही बहुमताचा दावा केला जात आहे.

काँग्रेसमधील निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरल्यामुळं आज, मध्य प्रदेशच नव्हे तर, देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीमाना दिला. ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतःचा वेगळा पक्ष काढून भाजपला मध्य प्रदेशात पाठिंबा देणार? याची उत्सुकता लागली आहे. 

तीन नेते बेंगळुरूला जाणार!
दरम्यान, काँग्रेसमधील ज्योतिरादित्य शिंदे गटातील आमदारांची एक यादी विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांच्याकडे पाठवण्यात आली. ही यादी 19 आमदारांची असल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतरच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आमदारांची बैठक बोलवली. यात काँग्रेस आमदार पीसी शर्मा आणि शोभा ओझा यांनी कमलनाथ सरकारच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. तसेच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला 94 आमदार उपस्थित राहिल्यानं काँग्रेस नेत्यांचा हुरूप वाढला. त्यानंतर नाराज काँग्रेस आमदारांची मनधरणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात सज्जनसिंह वर्मा आणि गोविंद सिंह या दोन नेत्यांसोबत आणखी एक अराजकीय व्यक्ती बेंगळुरूला नाराज आमदारांना भेटण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देणाऱ्या आमदारांची यादी आणि त्यावरील सह्या ह्या दबावाने घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

'ज्योतिरादित्य शिंदेंनी फसवलं'
ज्योतिरादित्य शिंदे यांनी आमच्या सह्या घेताना फसवणूक केल्याचा आरोप शोभा ओझा यांनी मीडियाशी बोलताना केला. राज्यसभेची उमदेवारी मिळवण्यासाठी पाठिंब्याच्या सह्या घेऊन, त्या बंडखोरीसाठी वापरल्या गेल्याचा आरोपर शोभा ओझा यांनी केला. सभागृहात फ्लोअर टेस्टच्या वेळी काँग्रेस आमदार एकजुटीनं कमलनाथ सरकारच्या बाजूनं मतदान करतील, असा दावा ओझा यांनी यावेळी केला. आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे, त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नाराज आमदारांची घरवापसी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार असल्याचं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com