दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी येथे वाचा एका क्लिकवर

आजपासून (21 एप्रिल) राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
esakal Breaking News
esakal Breaking News

कर्नाटक निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, स्टार प्रचारकांत अजित पवार नाहीत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. दरम्यान स्टार प्रचारकांचीही नावे यावेळी जाहीर करण्यात आली आहेत. मात्र या यादीत पक्षाचे नेते अजित पवार यांचे नाव नाहीये. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सीबीआयने समन्स बजावल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी मी खरं बोलून काही लोकांचे पाप उघड केले आहेत म्हणून मला बोलवणं आलं आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे घाबरणार नाही, सत्यासोबत उभा राहील असे सत्यपाल मलिक म्हणाले आहेत.

सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस

सीबीआयने मला 27 किंवा 28 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील कथित विमा घोटाळ्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांच्या दिल्ली कार्यालयात येण्यास सांगितलं आहे अशी माहिती, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.

मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे आहे - एकनाथ शिंदे

आज मराठा आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली, या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षण रद्द करताना त्यामध्ये राहिलेल्या त्रुटी राज्य सरकार लवकरत पुर्ण करेल, त्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पुर्तता करण्यात येईल. तसेच राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. त्यासाठी तातडीने क्युरेटीव्ह पेटीशन दाखल केली जाईल असं अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

सुदानमधील परिस्थितीचा  पंतप्रधान मोदींकडून आढावा, दिल्या महत्वाच्या सूचना

सुदानमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी सुदानमधील सर्वात अलीकडील घडामोडींचे मूल्यांकन केले आणि सध्या देशभरात असलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करून, जमिनीवरील परिस्थितीचा प्रथमदर्शनी आढावा यावेळी घेताला.

गेल्या आठवड्यात गोळीबारता बळी पडलेल्या भारतीय नागरिकाच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. त्यांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या, घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि सुदानमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचे सतत मूल्यांकन करावे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या.

ज्या झाडाला फळ लागतात, त्यालाच दगडं मारली जातात; देसाईंचा राऊतांना टोला

सातारा : सत्तेत असल्यावर कायमच आम्हाला टार्गेट केलं जातंय. ज्या झाडाला फळ लागतात त्यालाच दगड मारली जातात. टार्गेट केलं म्हणून आम्ही खचून जाणार नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याच्या अधिकार आहे. तेच आम्ही केलंय, यामुळं जे कोणी आमच्या जवळ येतील त्यांना सामावून घेण्याची आमची तयारी आहे, असं साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता

एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) हा अंदाज वर्तवला आहे.

गोध्रा प्रकरणः साबरमती एक्स्प्रेस आग प्रकरणातील 8 दोषींना सुप्रीम कोर्टानं जामीन केला मंजूर

गुजरात : गुजरातमधील गोध्रा येथे २००२ मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या सर्व दोषींना 17 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयानं चार दोषींना जामीन देण्यास नकार दिला. त्यांना कनिष्ठ न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर उच्च न्यायालयानं त्याचं जन्मठेपेत रूपांतर केलं.

esakal Breaking News
Godhra Case : साबरमती एक्सप्रेस आग प्रकरणातील आठ दोषींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

कोण संजय राऊत? मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं; अजित पवारांचा टोला

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. “तुम्ही बोलल्यानंतरही खासदार संजय राऊत सल्ले देत आहेत, त्यांची मतं मांडत आहेत,” असा प्रश्न त्यांना या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी कोण संजय राऊत ? असं म्हणत जोरदार टोलाही लगावला. “मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाच्या नादाला का लागावं? मी फक्त आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो,” असंही पवार म्हटलं आहे.

पुण्यात ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम; बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी

ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात येताना दिसत आहे. आता शिंदे गटाने पुण्यात ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्यालाच शिंदे गटात घेतलं आहे. या नेत्याने ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून शिंदे गटाची वाट धरली आहे. बाळासाहेब चांदेरे असं या ठाकरे गटाच्या नेत्याचं नाव आहे. बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. 

नागपूर खंडपीठाचा अदर पूनावालांना दणका; बजावली कारणे दाखवा नोटीस

सीरम इन्स्टिट्यूट आणि अदर पूनावाला यांना अव्हेकन इंडिया मुव्हमेंटच्या सदस्यांविरुद्ध खोटा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी नागपूर खंडपीठाने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. लसीचे घातक दुष्परिणाम लपवून लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खोटा दावा करून या लसीवर बंदी का घालू नये असा प्रश्न विचारत याची कारणे दाखवा नोटीस नागपूर खंडपीठाने बजावली आहे.

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; अब्रूनुकसानीचा दावा दाखल

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी मुलुंड न्यायालयात नारायण राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. भांडूप येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणे यांनी राऊतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात आता संजय राऊत यांनी राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

बेळगाव : खानापुरात अपघातात 3 ठार

बेळगाव-खानापूर : गोधोळी गावाच्या हद्दीत धारवाड-रामनगर राज्य महामार्गावर शेतात जाणाऱ्या चार शेतकऱ्यांवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने 2 शेतकरी जागीच ठार तर एकाचा केएलईत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. गोधोळीचे 4 शेतकरी त्यांच्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी जात होते. गावाच्या शिवारात पायी चालत शेताकडे जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी एकाचा बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर दुसरा किरकोळ जखमी झाला.

CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सह्यांद्री अतिथी गृहावर दुपारी १ वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीला मंत्री उदय सांमत, शंभूराज देसाईंसह इतर मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर

गुरुवारी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. अदानी यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी उदय सामंत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

दिल्लीतील साकेत कोर्टात तोतया वकिलाचा गोळीबार

दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गोळीबारामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

esakal Breaking News
Delhi Saket Court Firing: दिल्लीतील साकेत कोर्टात तोतया वकिलाचा गोळीबार; महिला गंभीर जखमी

कर्नाटक : पीयूसीचा निकाल जाहीर, उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.६७

कर्नाटक पूर्व-विद्यापीठ परीक्षा मंडळानं कर्नाटक पीयूसी निकाल जाहीर केला आहे. यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.६७ इतकी आहे. कर्नाटक 12 वीचा निकाल 2023 बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल - karresults.nic.in.

esakal Breaking News
Karnataka 2nd PUC Result : व्दितीय PUC परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या उत्तीर्णतेची टक्केवारी

24 तासांत भारतात आढळले कोरोना विषाणूचे 11,692 नवे रुग्ण

भारतात कोरोना विषाणूचा धोका अजूनही कायम आहे. आजही देशात कोरोना व्हायरसच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढं गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात कोरोना विषाणूचे ११,६९२ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या ६६,१७० आहे.

मराठा आरक्षणात कुठे कमी पडले हे लोकांना सांगा- संजय राऊत

मराठा आरक्षणात कुठं कमी पडले हे लोकांना सांगा. इतर सर्व निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात, निवडणूक आयोगात मॅनेज करतात, मग मराठा आरक्षण का नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. सीमावादाचा निकाल का लागत नाही. खारघर दुर्घटना कशी घडली हिंमत असेल तर महाराष्ट्राला सांगा, असं आव्हानही त्यांनी केलं आहे.

मुंबईत पुन्हा वाहतूक कोंडी; रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्यामुळं बिकट स्थिती

पावसाळ्यापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्राधिकरणांना दिले होते. त्यानंतर या सर्वच प्राधिकरणांनी मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्याचा फटका आता बसू लागला असून या भागात वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे. मुंबईत दुपारी अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात सुरू असते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

जम्बो कोविड सेंटर प्रकरण : संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार करून निविदा मंजूर करून घेतल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पीएमआरडीएचे अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे यांनी फिर्याद दिली आहे.  त्यानुसार पोलिसांनी भादवी कलम 420, 426, 465, 467 ,468, 471, 511 ,34 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

पुण्यात बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर संशयिताने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात एका ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफीक शेख (वय ४५) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनमाडला ठाकरे-शिंदे गटांत राडा

मनमाड बाजार समिती निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 20) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाणदेखील केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार आणि पोलिस अधिकारी यांच्या समोरच ही घटना घडली.

देशाच्या 53 बँकांमध्ये पुणे जिल्हा बँक भागभांडवलमध्ये पहिला क्रमांकावर – अजित पवार

पुणे जिल्हा बँक अनेक गोष्टींमध्ये अग्रसेर असल्याचं मत अजित पवार यांनी पत्रकार परिषद व्यक्त केलं. पुणे जिल्हा बँकेचा एकूण निधी २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. बँकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ झाली आहे. बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के असून पुणे जिल्हा बँकेचे खेळतं भांडवाल मागील वर्षांपेक्षा वाढलं आहे. बँकेचा नफाही वाढला आहे. देशाच्या 53 बँकांपैकी पुणे जिल्हा बँक भागभांडवलमध्ये पहिला क्रमांक लागतो. ठेवी विचारात घेता देशात आपला पाचवा क्रमांक लागतो. बँकेची मालमत्ता विचारात घेता जिल्हा बँकेचा चौथा क्रमांक लागतो, असंही त्यांनी सांगितलं.

अमित शहा आज कर्नाटकात रोड शो करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकात पोहोचले आहेत. कर्नाटकातील निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा येथे रॅलीसाठी पोहोचत आहेत. 10 मे रोजी कर्नाटकात निवडणुका होणार आहेत, तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

कर्नाटक PUC चा निकाल आज जाहीर होणार

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळानं कर्नाटक 12 PUC निकाल 2023 तारीख प्रसिद्ध केली आहे. कर्नाटक इयत्ता 12 वीचा निकाल 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे.

पुंछ दहशतवादी हल्ला : भारतीय लष्करानं शहीद जवानांची यादी केली जाहीर

दहशतवादी हल्ल्यानं जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) पुन्हा हादरलं आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला (Grenade Attack By Terrorists) केला. त्यामुळं ट्रकला भीषण आग लागली. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये हवालदार मनदीप सिंग, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई हरकृष्ण सिंग आणि शिपाई सेवक सिंग यांचा समावेश आहे.

राज्यात दोन दिवस पावसाचा अंदाज

राज्यातील बहुतांश भागांत गुरुवारी गारपिटीसह हलका पाऊस झाल्याने तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली. 23 एप्रिलपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत दिवसा ऊन, तर सायंकाळी पाऊस असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी राज्यातील पुणे, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, जालना, बीड, जळगाव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडला; तर काही भागांत गारपीट झाली.

ट्विटरने ब्ल्यू टिक केली बंद

ट्विटर युजर्ससाठी मोठी बातमी असून गुरुवारी मध्यरात्रीपासून व्हेरिफाईड अकाऊंट्सवरून फ्री ब्ल्यू टिक्स काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. या सेवेसाठी ज्या वापरकर्त्यांनी पैसे मोजलेले नाही अशांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढण्यात आल्या आहेत.

esakal Breaking News
Twitter Blue Tick : ट्विटरनं बंद केली ब्ल्यू टिक; विराट, धोनी ते बिग बींपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा यादीत समावेश

उन्हाळी सुट्टीनिमित्त पुणे विभागाकडून एसटीच्या 59 जादा गाड्या

सुट्ट्यांमुळं प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत एसटीच्या पुणे विभागानं हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड डेपोमधून 16 जादा गाड्या धावत आहेत. तर शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड, बारामती या डेपोंमधून एकूण 59 ज्यादा गाड्या सोडल्या गेल्यात आहेत.

esakal Breaking News
संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राजाराम साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस

आज शेवटच्या दिवशी सतेज पाटील यांची कसबा बावड्यात तर महाडिक यांची शिरोलीत जाहीर सभा होणार आहे. शेवटच्या सभेतून दोघांकडून टिकेचा समाचार घेतला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यात आरोपांच्या फैरी सुरु आहेत.

परशुराम घाट 27 एप्रिल ते 3 मे पर्यंत बंद राहणार

कोकणातील परशुराम घाट 27 एप्रिल ते 3 मे पर्यंत बंद राहणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. घाटातील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली जाणार आहे. परशुराम घाट एका आठवड्यासाठी बंद राहणार आहे.

राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी नागरीक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

आजपासून शाळांना सुट्टी, 15 जूनपासून शाळा सुरु होणार

Latest Marathi News : सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दक्ष झालं असून, आजपासून (21 एप्रिल) राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण व क्रीडा विभागाकडून असा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारकडून एक पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. शिवाय, भाजपची आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. काल जम्मू-काश्मीरमधील पूंछ-जम्मू महामार्गावर एका लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागून पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. देशभरात काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे, तर काही भागांना उन्हाचा तडाखा बसत आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com