
यामध्ये भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या चार देशांचे नौदल एकत्रितपणे हा सराव करणार आहे.
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरामध्ये 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान मलबार 2020 युद्धाभ्यास पार पडणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम बंदराजवळच्या समुद्रात हा युद्धाभ्यास होणार आहे. यामध्ये भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या चार देशांचे नौदल एकत्रितपणे हा सराव करणार आहे. पहिला टप्पा हा या ठिकाणी पार पडणार असून याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
मलबार युद्धाभ्यासासाठी भारतात आणि अमेरिकेत 1992 साली करार झाला होता. करारानुसार, भारत आणि अमेरिकेचे नौदल या युद्धाभ्यासात एकत्रितपणे काम करत होते. यामध्ये जपानदेखील 2015 साली पहिल्यांदा सामिल झाला. आणि आता यावर्षी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियादेखील सहभागी होणार आहे. क्वाड अर्थात Quadrilateral Security Dialogue - QSD or QUAD चे सदस्य म्हणजे हे चारही देश सरावाद्वारे थेट चीनला संदेश देणार आहेत. या निमित्ताने क्वाडचे सामर्थ्य दाखवून देत चीनला स्पष्ट इशारा दिला जाईल. कारण चीन कृत्रिम बेटांच्या निर्मितीद्वारे पाकिस्तानच्या मदतीने भारताला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. भारताला कोंडीत पकडू इच्छिणाऱ्या चीनला या युद्धाभ्यासाद्वारे धडकी भरणार आहे.
हेही वाचा - खुशखबर : लशीआधीच औषध येण्याची शक्यता; दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी
या युद्धाभ्यासाचा दुसरा टप्पा 17 ते 20 नोव्हेंबर या दरम्येान अरबी समुद्रात पार पडणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यात भारतासह जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. या युद्धाभ्यासाचा यजमान अर्थातच भारत आहे. या युद्धाभ्यासामध्ये भारताद्वारे विनाशिका आणि शिवालिक या फ्रिगेट सहभागी होणार आहेत. या युद्धनौका शक्तीशाली मानल्या जातात. यांसह सुकन्या नावाची गस्तीनौका तसेच शक्ती ही इंधन टँकरची नौका तसेच सिंदुराज नावाची पाणबुडी नौका देखील या युद्धाभ्यासात भारताकडून सामिल होणार आहे. इतकंच नव्हे तर डॉर्निअर विमान, समुद्रातील गस्तीसाठी वापरले जाणारे पी 8 आय विमान आणि प्रशिक्षणासाठीचे एजेटी हॉक विमानदेखील यात असणार आहे. या एकूण युद्धाभ्यासाचे नेतृत्व रिअर ऍडमिरल आणि भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ध्वजाधिकारी संजय वात्स्यायान हे करणार आहेत.
या युद्धाभ्यासामध्ये अमेरिकेद्वारे जॉन मेकेन ही अचूक हल्ल्यासाठी प्रसिद्ध असणारी विनाशिका सहभागी होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून लांब पल्ल्याची बॅलरेट फ्रिगेट आणि एम एच 60 हेलिकॉप्टर या युद्धाभ्यासात असणार आहे. जपानकडून ओनामी नावाची विनाशिका आणि एस एच 60 हे हेलिकॉप्टर सहभागी असणार आहे. या सरावातील पहिल्या टप्प्यात पाण्याखालील लढाई, पाण्यावरील लढाई, पाण्यावरुन आकाशातील सोबत पाण्यावरुन जमीनीवरची लढाई याप्रकारचा सरावर समाविष्ट असणार आहे. यामध्ये पाणबुडीच्या विरोधातील लढाईचादेखील सराव होणार आहे. यात चारही देश परस्परांमध्ये समन्वय राखून समुद्रातून आकाशातील आव्हानांना दोन हात करणयाचाही सराव केला जाणार आहे. परस्परांचे नुकसान न होता शत्रूवर प्रभावी हल्ले करण्याचा सराव यामध्ये होणार आहे. स्वत:च्या आणि शत्रूच्या जहाजांमधील फरक ओळखून शत्रूच्या नौकांची कोंडी करण्याचा युद्धाभ्यास असणार आहे.