स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांनी घेतला दिल्लीचा निरोप!

Corona-Students
Corona-Students

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत आलेल्या पण कोरोना लाॅकडाऊनमुळे येथेच अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 1400 मुलांना घेऊन स्पेशल रेल्वे गाडी शनिवारी (ता.१६) रात्री 10 वाजता पुरानी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाराष्ट्राकडे रवाना झाली.

या कठीण काळात आपल्या घरी परत जाणे अशक्यप्राय वाटत असताना त्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या, मदत करणाऱ्या सर्वांना कृतज्ञतेचा नमस्कार करीत या विद्यार्थ्यांनी दिल्लीचा निरोप घेतला.

लाॅकडाऊनच्या काळात फक्त विद्यार्थ्यांसाठी असलेली ही पहिलीच रेल्वेगाडी शनिवारी सोडण्यात आली. यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर, निवासी आयुक्त समीर सहाय, समन्वयक राजेश बोनवटे आदींनी विशेष प्रयत्न केले. 

आपल्या चोवीस तासांच्या प्रवासात ही गाडी महाराष्ट्रातील भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि पुणे या स्थानकांवर थांबेल आणि तेथून वैद्यकीय तपासणीनंतर या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी पाठविण्यात येईल.

त्याप्रमाणे शनिवारी दुपारी चारला ही गाडी दिल्लीहून सुटणार होती. मात्र रेल्वेने ही वेळ रात्री आठला केल्याचे कळविले. प्रत्यक्षात 10.15 वाजता गाडी सुटली. 

सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना राहात असलेल्या भागांतून आंबेडकर स्टेडियम, गोल मार्केट आणि साकेत येथील केंद्रांवर वैद्यकीय स्क्रीनिंगसाठी नेण्यात आले. मात्र त्यांच्या गाडीच्या अगोदर सुटणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून जाणाऱ्या स्थलांतरित कष्टकऱ्यांची आरोग्य तपासणी व्हायची असल्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संध्याकाळी 4.30 ते 5 च्या दरम्यान सुरु झाली. दिवसभर ताटकळत बसावे लागलेले हे विद्यार्थी बसमधून रात्री 9 नंतर पुरानी दिल्ली रेल्वे स्थानकावर गटागटाने पोचले.

आपण परत जाणार हे निश्चित झाल्यावर विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना विविध माध्यमातून लेखी धन्यवाद दिले. ''लॉकडाऊन संपेपर्यंत आपण घरी जाऊ शकतो, ही आशाच आमच्या मनातून मावळली होती. पालकांची अस्वस्थता, सभोवतीच्या वातावरणातील तसंच मनातील नकारात्मकता, जवळचे पैसे संपलेले आणि या सर्वांचा यूपीएससी आणि इतर परीक्षांच्या अभ्यासावर होणारा गंभीर परिणाम सतत जाणवून हे विद्यार्थी दिवसेंदिवस अधिकाधिक अस्वस्थ होत होते.

मात्र 54 दिवसानंतर का होईना त्यांची दिल्लीतून सुटका झाली. ''तुमच्या सार्‍यांच्या परिश्रमांनी हे सारे घडले हे सतत जाणवत आहे,'' अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राजधानी दिल्ली गाठणाऱ्या मराठी मुलांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे दिल्लीत स्थायिक असलेल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com