मेधा पाटकर यांची प्रकृती बिघडली; नर्मदा खोऱ्यात सुरू आहे बेमुदत उपोषण

मेधा पाटकर यांची प्रकृती बिघडली; नर्मदा खोऱ्यात सुरू आहे बेमुदत उपोषण

छोटा बडदा (मध्य प्रदेश) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. नर्मदा सरोवर परिसरातील गावांच्या पुनर्वसनाची मागणी घेऊन त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये सरदार सरोवर धरणाचे दरवाजे बंद करण्यात येणार असल्यामुळे नर्मदा सरोवर परिसरातील गावे पाण्यात जाण्याचा धोका आहे. परिणामी दोन लाख ग्रामस्थ विस्थापित होणार आहेत. त्यामुळेच आधी त्यांचे पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच धरणाचे दरवाजे बंद करावेत, अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली आहे. त्यांच्यासोबत धोकादायक गावांमधील 24 महिलाही उपोषणाला बसल्या आहेत. सलग नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मेधा पाटकर यांची प्रकृती बिघडली आहे. 

काय आहे मूळ समस्या?
सरदार सरोवराच्या पाण्याची उंची 134 मीटरने वाढली आहे. परिणामी धरणाचे पाणी नर्मदा खोऱ्यातील 192 छोट्या छोट्या गावांमध्ये शिरण्याचा धोका आहे. यात गावांचे अस्तित्वच धोक्यात आले असून, 32 हजार कुटुंबांतील जवळपास दोन लाख ग्रामस्थांना याचा धोका आहे. मेधा पाटकर यांनी नर्मदा खोऱ्यातीलच छोटा बडदा गावात उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यात या गावांमधील महिलांनीही सहभाग घेतला आहे. मुळात सुप्रीम कोर्टाने खोऱ्यातील संबंधित 32 हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद न करण्याची मेधा पाटकर आणि आंदोलकांची मागणी आहे. तसेच 122 मीटरपर्यंत गावांना धोका नसल्यामुळे पाणी पातळी तेवढीच ठेवावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे. 

चौथ्या दिवसापासून प्रकृतीत बिघाड
उपोषण सुरू झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून मेधा पाटकर यांची प्रकृती हळू हळू बिघडत आहे. पण, देशभरातून वेगवेगळ्या चळवळींमधील कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्यामुळे नैतिक बळ मिळत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे हजारो एकर उपयुक्त शेत जमीन पाण्याखाली जाणार आहे. तसेच आमच्या सारख्या कुटुंबांसाठी निवाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे, अशी प्रतिक्रिया एका आंदोलनकाने दिली आहे. 

मध्य प्रदेश सरकारकडे पाठपुरावा
नर्मदा बचाव आंदोलन समितीने या संदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करून यात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तर, भारती कम्युनिस्ट पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा देत पंत्रप्रधान नरेंद्र मोदींना या संदर्भात पत्र लिहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com