esakal | PM मोदींकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा कलम 370 आठवतं - मेहबुबा मुफ्ती
sakal

बोलून बातमी शोधा

mehbooba-mufti target pm modi over kashmir-article-370 issue in bihar election

पंतप्रधान मोदींनी कलम 370 वरून विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. मोदींच्या या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरमधील पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जोरदार हल्लाबोल केला.

PM मोदींकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा कलम 370 आठवतं - मेहबुबा मुफ्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आमने सामने होते. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या 2 सभा होत्या. या सभेत पंतप्रधान मोदींनी कलम 370 वरून विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. मोदींच्या या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरमधील पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी जोरदार हल्लाबोल केला.

भारताची अर्थव्यवस्था बांगलादेशपेक्षा मागे पडली आहे. बेरोजगारीसह इतर अनेक समस्या सोडवण्यात मोदी सरकारला अपय़श आलं आहे. जेव्हा ते या सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरले तेव्हा त्यांनी काश्मीर आणि कलम 370 आठवतं असा टोला पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी लगावला.

मते मागण्यासाठी त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही. ते म्हणाले की तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये जमिन विकत घेऊ शकता. आम्ही कलम 370 हटवलं. त्यांनी व्हॅक्सिन फ्रीमध्ये देऊ असंही आश्वासन दिलं आहे. आज मोदी मतांसाठी कलम 370 चा मुद्दा पुढे करत आहेत. त्यांचे सरकार देशाच्या अडचणी सोडवण्यात अपयशी ठरल्याचं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

हे वाचा - 'लालटेन'चा जमाना आता गेला; बिहारला मागास ठेवणाऱ्या विरोधकांना दूर ठेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सासाराम इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत सभा घेतली. त्या सभेमध्ये मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तेव्हा मोदींनी म्हटलं की, कलम 370 चा निर्णय आम्ही घेतला. एनडीए सरकारने घेतलेला हा निर्णय आता मागे घ्यावा म्हणून विरोधक बोलत आहेत. सत्तेत आल्यास आम्ही कलम 370 पुन्हा लागू करू असं सांगत आहेत. या लोकांना तुमच्या गरजा, समस्या यांच्याशी काही देणं घेणं नाही असंही मोदी सभेत म्हणाले होते. 

हे वाचा - जेंव्हा पाकिस्ताननं काश्मीरमध्ये पहिल्यांदा घुसखोरी केली; पाकच्या कुटील कारवायांचा काळा दिवस

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सभा घेतल्या. यामध्ये मोदींनी अनेक मुद्द्यावरून विरोधकांना टार्गेट केलं. सासाराम इथल्या सभेनंतर मोदी भागलपूर इथं पोहोचले होते. या सभेत मोदींनी आरजेडीने केलेल्या सरकारी नोकरीच्या दाव्यावरून टीका केली. मोदी म्हणाले की, सरकारी नोकरीचं आश्वासन म्हणजे लाच मिळवण्याचं एक माध्यम बनवलं आहे. बिहारमध्ये विकास व्हावा, गुंतवणूक व्हावी यासाठी कोण प्रयत्न करणार? ज्यांनी सुशासन दिलं ते की ज्यांनी जंगलराज दिलं ते करणार असा सवालही मोदींनी विचारला.