देशातील ५९ जिल्हे कोरोनामुक्त; नियमभंगाप्रकरणी केरळ सरकारची कानउघडणी!

वृत्तसंस्था
Monday, 20 April 2020

केंद्र सरकारने कानउघडणी केल्यानंतर केरळ सरकारने बस आणि इतर वाहतूक तसेच हॉटेल सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असताना काही ठिकाणी कोरोनाला आळा घालण्यात यशही येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १५५३ नवीन केसेस पुढे आल्या असून आतापर्यंत ३६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७२६५ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत दिली. 

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

५९ जिल्हे कोरोनामुक्त
देशातील २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण ५९ जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्व जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तसेच पुदुच्चेरीतील माहे, कर्नाटकमधील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढ़वाल याठिकाणी गेल्या २८ दिवसांत एकही कोरोनाची केस आढळली नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. 

- वडिलांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथांचं आईला भावनिक पत्र!

संपूर्ण देशातील लॉकडाऊन स्थितीवरही आरोग्य मंत्रालय बारकाईने नजर ठेवून आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या कंट्रोल रूममधून संबंधित राज्यांना सूचना दिल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आवाहनही आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना केले आहे. 

- लॉकडाऊन शिथिल झाला समुद्रकिनारी तुफान गर्दी; अमेरिकेत पोलिसांच्या डोक्याला ताप

केंद्र सरकारचे केरळवर ताशेरे
लॉकडाऊन लागू केल्यानंतर केरळ सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता नागरिकांना सूट दिली. यामुळे अधिनियम २००५ नुसार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल केरळ राज्य सरकारवर केंद्रीय गृह मंत्रालयाने ताशेरे ओढले आहेत. यापुढे गृह मंत्रालयाच्या परवानगीनंतरच पुढील पावले उचलावीत असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. 

केरळचा यू-टर्न
केंद्र सरकारने कानउघडणी केल्यानंतर केरळ सरकारने बस आणि इतर वाहतूक तसेच हॉटेल सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्य सचिव टॉम जोस आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी लगेच तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर राज्यातील वाहतूक आणि हॉटेल पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येतील. फक्त पार्सल सेवा सुरू राहील, असे आदेश काढले आहेत.

Video : CoronaFighter : कमाॅन मम्मा घरात बसू नकाेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHA declared that 59 districts has been reported no Covid 19 cases in last 14 days