Nagrota Encounter: कमांडो ट्रेनिंग घेतलेल्या दहशतवाद्यांनी 30 KM चालत केला होता प्रवास...

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

गुरुवारी झालेल्या जम्मूमधील नगरोटा परिसरातील चकमकीसंदर्भात नवीन खुलासे समोर आले आहेत

नगरोटा: गुरुवारी झालेल्या जम्मूमधील नगरोटा परिसरातील चकमकीसंदर्भात नवीन खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणाबद्दलचे दोन मोठे खुलासे समोर आले आहेत. पहिला म्हणजे हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातील दहशवाद्यांच्या म्होरक्यासोबत संपर्कात होते. त्यांच्याकडे सापडलेल्या वस्तू पाकिस्तानमधून तयार करण्यात आलेल्या होत्या. तर दुसरा खुलासा म्हणजे हे दहशतवादी भारतात कसे घुसले याबाबत आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नगरोटा येथे गुरुवारी एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांविषयी नवीन माहिती समोर आली आहे. पठाणकोट येथे 2016च्या हवाई हल्ल्याचा मुख्य आरोपी जैश-ए-मोहम्मद (JeM) चा ऑपरेशनल कमांडर कासिम जान हा देखील नगरोटाच्या संपूर्ण षडयंत्रात सहभागी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दक्षिण काश्मीरमध्ये कासिमचे बरेच साथीदार आहेत, जे त्याच्या इशाऱ्यावर कोणतीही घटना घडवून आणण्यास तयार आहेत. कासिम हा भारतातील जैश दहशतवाद्यांचा मुख्य कमांडर आहे. याचबरोबर दहशतवादी मुफ्ती रऊफ असगर याच्याशी त्याचा थेट संबंध असल्याचंही समोर आलं आहे.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

कशी केली घूसखोरी-
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी सुमारे अडीच तास पायी भारताच्या सीमेवर पोहोचले. दहशतवाद्यांचा संभाव्य मार्ग रामगड ते हिरानगर सेक्टरमधील सांबा सेक्टरमधील मावा गाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तिथून नानाथ नाल्याजवळील कच्च्या रुळावरून सीमेवर पोहोचले. त्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत हे दहशतवादी ट्रकमधून फिरत होते. साधारण 4.30 च्या आसपास जम्मू इथल्या नगरोटा टोल नाक्याजवळ आले. तिथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मदच्या चारही दहशतवाद्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आलं होतं. ठार करण्यात आलेले दहशतवादी शकरगाह इथून सांबा सीमा ओलांडून 30 किलोमीटर पायी चालत आले होते. त्यानंतर जटवाल येथील पिककअप पॉइंटवर पोहोचले अमावास्येच्या रात्रीत काळोखाचा फायदा घेऊन या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा - नव्या संसदेचे भारतीय पद्धतीने सुशोभिकरण; अशी असणार आहे आपली नवी संसद

अफगाणिस्तानातून अमेरिकेनं सैन्य हटवल्यानंतर जैश ए मोहम्मदने काश्मीरमध्ये पुन्हा कुरापती सुरू केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 विशेष प्रशिक्षण दिलेल्या दहशतवाद्यांना गुजांवाला मार्गानं भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू होती, ही माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagrota Encounter new explanation JeM walked 30 km