मोदींचा 'मौन' राग; पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे नाहीच

मोदींचा 'मौन' राग; पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे नाहीच

नवी दिल्ली : ''ते आले, त्यांनी पाहिलं, सद्यःस्थितीवर तोंडदेखलं भाष्यही केलं; पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना मात्र सोयीने बगल दिली.'' मागील पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची पहिली पत्रकार परिषदही राजकीयदृष्ट्या "म्यूट' ठरली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनीच माध्यमांच्या प्रश्‍नांना सामोरे जात विजयाचा राग आळवला. भाजपला तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील आणि नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज झाली. त्यानिमित्ताने राजधानीत एकाच वेळी भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी, तर कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा घेऊन विजयाचा दावा केला. 

Loksabha 2019: 'फिर एक बार मोदी सरकार' ही जनतेचीच घोषणा- अमित शहा 

मोदी यांनी या वेळी संक्षिप्त निवेदन करताना विजयाची खात्री व्यक्त केली आणि पूर्ण बहुमत असलेल्या सरकारलाच लागोपाठ दुसऱ्यांदा जनतेचा कौल मिळण्याचा हा दीर्घ काळानंतरचा प्रसंग असेल, असेही सूचक विधान त्यांनी केले. राहुल गांधी यांनी धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या आघाडीला विजय मिळेल आणि निकालांनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्‍चित केला जाईल, असे सांगितले. या दोन्ही नेत्यांच्या पत्रकार परिषदा एकाच वेळी झाल्या आणि त्यांच्या माध्यमातून बहुधा प्रथमच दोन प्रमुख प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष व त्यांचे नेते "आमने-सामने' आले. मोदी व शहा यांनी आज भाजपच्या मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना प्रचाराचा आढावा घेतला तसेच विजयाबद्दलचा आत्मविश्‍वासही व्यक्त केला. 

मोदी यांनी या वेळी केवळ एक लहानसे निवेदन केले; परंतु पत्रकारांचे प्रश्‍न घेतले नाहीत. त्यांना उद्देशून पत्रकारांनी विचारलेले प्रश्‍न त्यांनी उत्तरासाठी शहा यांच्याकडे टोलवले. 

शहा यांनी सुरवातीला एक लांबलचक निवेदन वाचून दाखविले व त्यामध्ये पक्षाने प्रचाराचे केलेले नियोजन, कार्यकर्त्यांची मेहनत व काम तसेच मोदी, ते स्वतः, पक्षाचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी घेतलेल्या प्रचारसभा यांची आकडेवारी सादर केली. या वेळी मोदी म्हणाले, ""मागील पाच वर्षांतील कामाच्या आधारे आपण पुन्हा जनतेकडे आशीर्वाद मागण्याच्या भावनेने गेलो होतो आणि त्याला जनतेकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. काहीकाळ विश्रांती घेतल्यानंतर आपण "कामाला लागू' जनतेच्या आशीर्वादानेच आपले भावी सरकार पुढे चालू राहील.'' 

Loksabha 2019: मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपरूर्व घटना : राहुल गांधी

शहांना विजयाचा विश्‍वास 
शहा यांना या वेळी महात्मा गांधी यांच्या विरोधातील भाजप नेत्यांची विधाने, राफेल व्यवहार, ममता बॅनर्जी व प्रचाराची खालावलेली पातळी, आगामी सरकार याबाबत प्रश्‍न करण्यात आले. यातील काही प्रश्‍न पंतप्रधानांना उद्देशून असूनही, त्यांनी "मी पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे. पत्रकार परिषद त्यांची आहे व तेच उत्तरे देतील', असे सांगून पत्रकारांचे प्रश्‍न टोलावून लावले. तीनशेपेक्षा अधिक जागा मिळण्यामागील गणिताबद्दल विचारले असता, शहा यांनी मोदी सरकारने सुरू केलेल्या 133 कल्याणकारी योजनांचे देशात 22 कोटी लाभार्थी असून, त्यांच्या मदतीनेच 300 जागा पार करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

मोदींची पहिली पत्रकार परिषद: पाच वर्षात भरीव कामे केली

भाजप तीनशेपार जाईल 
"एक बार फिर, मोदी सरकार' ही घोषणा लोकांनी बदलून "बार बार, मोदी सरकार' किंवा "मोदी सरकार, तीनसौ पार' असे बदल केले, हा त्याचा पुरावा असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, भाजपला स्वतःला तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील. गेल्यावेळेपेक्षा हे मोठे बहुमत असेल; परंतु भाजपने आघाडी म्हणून ही निवडणूक लढवलेली असल्याने सरकार स्थापनेत आघाडीतील घटक पक्षांनाही सामावून घेतले जाईल. त्याचबरोबर भाजपचा जाहीरनामा व कार्यक्रमपत्रिकेशी सहमत असणारे अन्य कुणी आघाडीबाहेरच्या पक्षांनी सहकार्याची तयारी दर्शविल्यास त्यांनाही बरोबर घेतले जाईल. 

शहांचे बोल 
भाजपच्या नेत्यांचा भर विकासावरच 
माध्यमांकडून विकासाचे वार्तांकन नाही 
प्रचाराची पातळी आमच्यामुळे खालावली नाही 
कॉंग्रेसकडून हिंदूंचा जगभर अवमान 
"समझौता'प्रकरणी कॉंग्रेसकडून बनावट खटले 
कॉंग्रेसच्या कृत्याचा निषेध म्हणून प्रज्ञासिंहांना उमेदवारी 
महात्मा गांधींबद्दलचे प्रज्ञासिंहांचे उद्‌गार अमान्य 
राफेल व्यवहारात एका पैशाचाही गैरव्यवहार नाही 

पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारात भाजपचे 80 कार्यकर्ते मृत्युमुखी पडले, याला ममताच जबाबदार आहेत. भाजपने देशात सर्व राज्यांत निवडणूक लढविली असताना फक्त बंगालमध्येच हिंसाचार का झाला, याचे उत्तरही ममतांनी द्यावे. 
- अमित शहा, अध्यक्ष भाजप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com