भारतात दर 17 मिनिटांनी घडताहेत बलात्कार!

भारतात दर 17 मिनिटांनी घडताहेत बलात्कार!

सातारा : भारतात एकूण गुन्हेगारीमध्ये बलात्कार हा गुन्हा अव्वल क्रमांकावर येतो. दरवर्षी साधारण तीस ते चाळीस हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद देशात होते. हे झाले नोंद झालेल्या गुन्ह्यांबद्दल; पण अनेक प्रकरणात बलात्काराची नोंददेखील केली जात नाही किंवा अशी प्रकरणे दाबली जातात. अजून एक दुर्दैवी बाब म्हणजे, बलात्काऱ्यांना शिक्षा मिळण्याची आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. दुर्दैवाने दिवसेंदिवस या गुन्ह्याची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढत चालली असल्याचे एनसीआरबीच्या (राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग) अहवालातून स्पष्ट होत आहे. 

२०१९ मध्ये भारतात बलात्काराच्या घटनांत मोठी वाढ झाली असून ३०,६४१ केसेस बलात्काराच्या बाबतीत नोंदवण्यात आल्या आहेत, देशात दर १७ मिनिटांनी बलात्कार होत असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांचा कसून तपास केला असला तरी बलात्काराची आकडेवारी बरीच त्रासदायक आहे, कारण बलात्काराच्या घटनांमध्ये बरीच तफावत असल्याचे आढळून आले आहे. बलात्काराच्या केसेससंदर्भात न कळविल्या (नोंदविलेल्या) जाणार्‍या बलात्काराच्या केसेस एनसीआरबीने अंदाजे ७१% असल्याचे म्हटले आहे. 

सध्या अशा घटनांमध्ये केरळ आणि राजस्थानसारखी राज्ये ही महिलांसाठी सर्वात वाईट ठिकाणे असल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, तरीसुद्धा योग्यप्रकारे खटले नोंदवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जावे, असे एनसीआरबीने म्हटले आहे. केरळमध्ये २०२३ प्रकरणे असून त्यात १२६२ अल्पवयीन आहेत. राजस्थानमध्ये ५९९७ प्रकरणांपैकी १३१३ अल्पवयीन, तर आंध्रात १०८६ पैकी ५४४ अल्पवयीन होते. गुजरातच्या तुलनेत ५४८, महाराष्ट्रात २२९९,  मध्य प्रदेश २४८५, कर्नाटक ५०५ आणि तेलंगणामध्ये ८७३ प्रकरणात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पश्चिम बंगालने २०१९ च्या घटनांची नोंद केली नाही. तसेच, जर एखाद्या पतीने आपल्या पत्नीवर बलात्कार केला असेल, तर तो देखील भारतात बलात्कार मानला जात नाही, असेही एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दिल्ली, हैद्राबाद घटनेनंतर उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणाने देश हादरला. मात्र, मानवतेवर घाला घालणारी ही गुन्हेगारी प्रवृत्ती केवळ उत्तर प्रदेशपुरती मर्यादित नाही. गेल्या वर्षी देशभरात २८६ महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक ४७ महिला महाराष्ट्रातील होत्या. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) बुधवारी (३० सप्टेंबर) जारी केलेल्या अहवालानुसार गेल्यावर्षी महाराष्ट्रात अशा प्रकारचे सर्वाधिक गुन्हे नोंद केले गेले. त्याखालोखाल ३४ गुन्हे उत्तर प्रदेशात, तर सात गुन्हे राजस्थानात नोंदवण्यात आले.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्यावर्षी सर्वाधिक ५९ हजार ८५३ गुन्हे (महिलांविरोधी) उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले. त्याखालोखाल राजस्थानात ४१ हजार ५५०, तर महाराष्ट्रात ३७ हजार १४४ गुन्हे नोंद केले गेले. महिलांविरोधी गुन्ह्यांचे देशाचे सरासरी प्रमाण (दर लाख लोकसंख्येमागील गुन्हे) ६२.४ इतके  आहे. महाराष्ट्रातील प्रमाण ६३.१, तर राजस्थानात ११० इतके  आहे. बलात्कार-हत्येपाठोपाठ महिलांना विविध कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ८०८, उत्तर प्रदेशात ३५९ आणि राजस्थानात १८६ महिलांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आले. २०१८ मध्ये महाराष्ट्रात ९०० महिला-तरुणींनी दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या होत्या. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार नोंद गुन्ह्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशात दर लाख लोकसंख्येमागे सरासरी सात गुन्हे घडतात, तर महाराष्ट्रात ११, अशी नोंद एनसीआरबी अहवालात आढळते. 

९४ टक्के खटले प्रलंबित

एनसीआरबीच्या अहवालानुसार २०१९ अखेरीस महाराष्ट्रात महिलांविरोधी गुन्ह्याशी संबंधित दोन लाख सात हजार (९४ टक्के) खटले प्रलंबित आहेत. राज्यातील न्यायालयांनी वर्षभरात सुमारे १३ हजार खटले निकाली काढले. त्यापैकी दीड हजार खटल्यांमधील आरोपींचा गुन्हा सिद्ध होऊ शकला. त्यानुसार त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, साडेनऊ हजार खटल्यांमधील आरोपी पुराव्यांविना निदरेष सुटले. धक्कादायक बाब ही की, उत्तर प्रदेश (५५.२ टक्के), राजस्थानच्या (४५ टक्के) तुलनेत राज्याचा दोषसिद्धी दर खूपच कमी (१३.७ टक्के) आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर (१२ हजार ९०२), तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (६ हजार ५१९) आहे. 

सर्वाधिक बलात्कार गुन्हे असलेले देश

अमेरिका : अमेरिका ही बलात्काराच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. बलात्कार करणारे ९९ टक्के पुरूष असून त्यात पीडित या ९१ टक्के महिला आहेत, तर पुरूष पीडितांचे प्रमाणे ९ टक्के आहे. अमेरिकेतील ६ पैकी एका महिलेवर बलात्कार झाला आहे. तर ३३ पैकी १ पुरूषांवर बलात्काराची घटना घडली आहे. वयाच्या १४ व्या वर्षी बलात्कार झाल्याचे बहुतांशी बलात्कार पीडित महिलांचे अनुभव आहेत. अमेरिकेत बाहेर बलात्कार होत नसून बहुतांशी घरातच केले जातात. 

दक्षिण आफ्रिका :  बलात्काराच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. आकडेवारीननुसार ६५ हजार बलात्काराच्या प्रकरणांची नोंद आहे. याला रेप कॅपिटल म्हटले जाते. दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांवर बलात्कार होण्याचे प्रमाण अधिक आहे. बलात्काऱ्याला शिक्षा झाली तर ती केवळ २ वर्ष आहे. 

स्वीडन : युरोपात बलात्कार होणाऱ्या देशांमध्ये स्वीडनचा क्रमांक सर्वात पुढे लागतो. तसेच स्वीडनचा जगात रेप क्राईमच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. 

भारत : भारतात बलात्कार ही खूप मोठी समस्या झाली आहे. २०१९ मध्ये देशभरात २८६ महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार दर १७ मिनिटांनंतर भारतात एक बलात्कार होतो. 

ब्रिटन : ब्रिटन हा विकसीत देश म्हणून पाहायला येतात. पण, बलात्काराच्या बाबतीत हा देश भयावह आहे. यात इंग्लड आणि वेल्स या भागात दरवर्षी सरासरी ८५ हजार बलात्कार होतात. तर ४ लाख महिलांवर दरवर्षी लैंगिक अत्याचार केले जातात. 

जर्मनी : जर्मनीमध्ये आतापर्यंत २ लाख ४० हजार महिला या बलात्कारात ठार झाल्या आहेत. जर्मनी हा जगातील सहावा देश आहे ज्यात सर्वाधिक बलात्कार केले जातात.

फ्रान्स : फ्रान्समध्ये १९८० पर्यंत बलात्कार हा गुन्हा मानण्यात येत नव्हता. फ्रान्समध्ये दरवर्षी सुमारे ७५ हजार बलात्कार होतात. यातील १० टक्के जण तक्रार नोंदवितात.

कॅनडा : कॅनडात एकूण २५ लाख १६ हजार ९१८ बलात्काराच्या केसेस नोंदविण्यात आल्या आहे. यातील फक्त ६ टक्के तक्रार पोलिसांमध्ये नोंदविल्या गेल्या आहे. 

श्रीलंका : श्रीलंकेत १४.५ टक्के पुरूष आपल्या जीवनात कधी ना कधी बलात्काराच्या गुन्हात अडकलेले दिसतात. एकूण लोकसंख्येच्या ४.९ टक्के बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यातील २.७ टक्के पुरूषांनी पुरूषांवर बलात्कार केला आहे. १.६ टक्के गँग रेप झाले आहेत. ९६.५ टक्के बलात्कार करणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. 

इथोपिया : इथोपियामध्ये जवळपास ६० टक्के महिला या लैंगिक छळाला बळी पडतात.  बलात्कार ही इथोपियाचा सर्वात मोठी समस्या आहे. 

देशात २०१९ मध्ये महिला अत्याचाराच्या एकूण ४,०५,८६१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी ५९,८५३ गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशातील असून देशातील एकूण आकडेवारीच्या तुलनेत ही टक्केवारी १४.७ टक्के आहे. ही टक्केवारी देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. २०१८ मध्ये देशांत महिला अत्याचार गुन्ह्यांचा आकडा ३,७८,२७७ होता, त्यातील ५९,४४५ गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशात घडले होते. २०१६ मध्ये देशातला आकडा ३,२२,९२९ होता. २०१७ मध्ये ३,४२,९८९ होता.

दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला जुन्याच कायद्यानुसार चालला आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली, त्यामुळे मृत्यूनंतर निर्भयाला खरा न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया समस्त समाजाने दिली. पण, खरेतर निर्भयाच्या प्रकरणामुळे जो सामाजिक असंतोष उफाळून आला, त्या दबावामुळे तरी बलात्काराच्या कायद्यामध्ये बदल करावा लागला, हे खरे स्वागतार्ह आहे. केवळ कायद्यात बदल करून चालणार नाही, तर योग्य एफआयआर घेणे, न्यायवैद्यक पुरावा गोळा करणे, बलात्कार पीडितेचे मनोधैर्य वाढवणे, बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून तिला लवकरात लवकर न्याय मिळवून देणे ही खरी काळाची गरज आहे. बलात्काराच्या घटनेनंतर काही राजकीय पक्षांचे खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्ते, साधू संत, बाबा, बापू यांच्या वक्तव्यातून स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन समानतेचा नाही व पुरूषसत्ताक पद्ध्तीचे समर्थनच यातून सिद्ध् होते. कायद्यात कितीही बदल केले तरी न्याय अडखळत राहून खरोखरच न्याय मिळेल की नाही अशी भीती वाटते. बलात्काराच्या केसमध्ये कायदा कितीही कडक असला तरी दोषसिद्धीचे प्रमाण अत्यल्प आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com