आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ड्रग्जची किंमत ऐकून थक्क व्हाल

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन श्रीलंकन नागरिकांना चेन्नईतून अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

बेंगळुरू - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन श्रीलंकन नागरिकांना चेन्नईतून अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतही एनसीबीने कारवाई केली असून त्यात आणखी एकाला अटक करण्यात आलीआहे. बेंगळुरूतील कारवाईची माहिती एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. 

एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की, लंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेतून शंभर किलोग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आलं होतं. याची किंमत जवळपास 1 हजार कोटी रुपये असल्याचं सागंण्यात येत आहे. 

हे वाचा - लशीच्या यशात माझं काय श्रेय नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेरॉइन तस्करीचं हे जाळं पाकिस्तान, लंका, अफगाणिस्तान, इराण ते ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलं आहे. मल्होत्रा यांनी सांगितंल की, अटक करण्यात आलेले आरोपी एमएमएम नवास आणि मोहम्मद अपनास हे चेन्नईत ओळख लपवून राहत होते. त्यांना पकडण्यात एजन्सीला यश आलं.

गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर 2020 ला भारताच्या जल सीमा क्षेत्रात तुतीकोरिन बंदराजवळ इंडियन कोस्टगार्ड़ आणि एनसीबीने 95.87 किलोग्रॅम हेरॉइन आणि 18.32 किलोग्रॅम मेथमफेटामाइनसह मच्छिमारांना पकडलं होतं. श्रीलंकन जहाज शेनाया दुवा जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली.

हे वाचा - केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांवर भडकले; 11 वी बैठकही तोडग्याशिवाय

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या जहाजावरून पाच पिस्तुल आणि एक मॅगझीनसुद्धा जप्त केलं होतं. सहा श्रीलंकन नागरिकांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कारवाई करताना याचे संबंध आंतरराष्ट्रीय रॅकेटशी असल्याचा अंदाज होताच त्यामध्ये अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तानशी संबंधाचा संशय होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गांभीर्याने केला जात होता. यातील दोन प्रमुख संशयित चेन्नईत राहत असल्याचं माहिती होताच त्यांना पकडण्यासाठी जाळं लावण्यात आलं होतं असंही अधिकाऱ्याने सांगितलं.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB arrests 2 Sri Lankans running international drug racket