देशाचा 'मूड' समजलाय, आता वेगानं पुढे जायचंय - पंतप्रधान मोदी

pm modi india niti ayog
pm modi india niti ayog

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज निति आयोगाच्या 6 व्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोदींनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही कोरोनाच्या काळात पाहिलं की, कसं राज्य आणि केंद्र सरकारने मिळून एकत्र काम केलं आणि देश यशस्वी ठरला. जगात भारताची एक चांगली प्रतिमा निर्माण झाली. आज देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेली गव्हर्निंग काउन्सिलची बैठक महत्त्वाची आहे. राज्यांना विनंती आहे की, स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आपआपल्या राज्यात सर्व समाजाच्या लोकांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी. 

देशात 2014 नंतर गाव आणि शहरे मिळून 2 कोटी 40 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली. देशातील 6 शहरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घर बांधण्याची मोहिम सुरु आहे. एक महिन्यात नव्या तंत्रज्ञानाने चांगली घरे बांधण्याचं मॉडेल तयार होईल असं मोदी म्हणाले. 

देशाचा मूड समजला
यंदाच्या अर्थसंकल्पाबाबतही मोदींनी यावेळी भाष्य केले. मोदी म्हणाले की, अर्थसंकल्पावर ज्यापद्धतीने सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत त्यावरून देशाचा मूड काय आहे ते समजतं. देशाने ठरवलं आहे की आता वेगाने पुढे जायचं आहे. वेळ घालवायचा नाही. देशाच्या या मूडमध्ये तरुणांच्या मनाची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचंही मोदींनी म्हटलं. 

आत्मनिर्भर भारत
आत्मनिर्भर भारत अभियान एक अशा भारताच्या निर्मितीचा मार्ग आहे जो फक्त आपल्या गरजांसाठी नाही तर जगासाठी उत्पादन करेल आणि हे उत्पादन जगाच्या उत्कृष्टतेच्या कसोटीवरही खरं ठरेल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. 

जल मिशन
पाण्याच्या प्रदुषणाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, पाण्याची कमतरता आणि प्रदुषित झालेलं पाणी प्यायल्याने होणाऱे आजार लोकांच्या विकासात अडथळा निर्माण करत आहेत. जल मिशननंतर साडे तीन कोटींहून अधिक ग्रामीण भागातील घरांमध्ये नळातून पाणी पुरवठा सुरु झाला आहे. 

पीएलआय योजना
केंद्र सरकारने वेगवेगळ्या सेक्टरसाठी पीएलआय योजना सुरु केली आहे. यावर मोदी म्हणाले की, देशात मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी ही चांगली संधी आहे. राज्यांनी या योजनेचा फायद्या घ्यायला हवा आणि आपल्याकडे जास्तीजास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करायला हवं. कार्पोरेट टॅक्स कमी केल्याचा फायदाही राज्यांनी घ्यावा असं मोदींनी म्हटलं 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com