यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!

टीम ई-सकाळ
Thursday, 14 January 2021

परदेशी पाहुण्यांना निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

Republic Day 2021: नवी दिल्ली : भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन सोहळा यंदा परदेशी पाहुण्याविना पार पडणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थित साजरा केला जाणार आहे. त्यामुळे परदेशी पाहुण्यांना निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

CTET 2021: 'सीटीईटी' परीक्षेचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; परीक्षा 31 जानेवारीला होणार​

बोरिस जॉन्सन यांनी दिला होता नकार
प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून पहिली पसंती ब्रिटनच्या पंतप्रधानांना देण्यात आली होती. त्यांना निमंत्रणही देण्यात आलं होतं ते त्यांनी स्वीकारलंदेखील होतं. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा मुसंडी मारल्याने बोरिस जॉन्सन यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले. भारतातही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने परदेशी पाहुण्याला निमंत्रित करणं योग्य ठरणार नव्हतं. त्यामुळे आता कोणत्याही परदेशी पाहुण्याला निमंत्रित न करता प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. 

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​

१९६६ नंतर घडतोय असा इतिहास
या आधी १९६६मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले होते. त्यामुळे १९६६च्या प्रजासत्ताक दिनी कोणालाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. घटनात्मक आवश्यकतांनुसार प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावर्षी भारतीयांनी आपला प्रजासत्ताक दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला होता.

SC च्या समितीतून एकाचा काढता पाय; शेतकऱ्यांच्या हितासाठी आधीच माघार​

जुनी परंपरा
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परदेशी राष्ट्राच्या प्रमुखाला प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्याची जुनी परंपरा आहे. भारतीय संविधान स्थापित झाल्यानंतर ही परंपरा सुरू झाली. प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्याची निवड केवळ राजकीय, मुत्सद्दी आणि परस्पर संबंधांच्या आधारे केली जाते.

पहिले प्रमुख पाहुणे कोण?
१९५०मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर १९५४मध्ये भूटानचे राजे जिग्मे डोरजी आणि १९५५मध्ये पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल गुलाम मोहम्मद यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No chief guest on Republic day of India this year declared by Central Govt