esakal | शहराचे रहिवासी नसणाऱ्यांनी ऑक्सिजनविना मरावं का? तुघलकी निर्णयामुळे संताप

बोलून बातमी शोधा

Oxygen

एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज होती. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने तेथील ऑक्सिजन संपुष्टात आला असून रुग्णाने स्वतंत्र व्यवस्था करावी. असं लेटरहेडवर लिहूनही दिलं.

शहराचे रहिवासी नसणाऱ्यांनी ऑक्सिजनविना मरावं का? तुघलकी निर्णयामुळे संताप
sakal_logo
By
वृत्तसंस्था

गुरुग्राम : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम प्रशासनाने एक आदेश जारी केला असल्याने सर्वांच्याच मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे. गुरुग्राममधील सर्व ऑक्सिजन प्लांटमधून फक्त गुरुग्राममधील हॉस्पिटल्सना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, तसेच यावेळी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज होती. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने तेथील ऑक्सिजन संपुष्टात आला असून रुग्णाने स्वतंत्र व्यवस्था करावी. असं लेटरहेडवर लिहूनही दिलं. पण तरीही त्या रुग्णाला ऑक्सिजन मिळाला नाही. आम्ही फक्त गुरुग्राममधील हॉस्पिटल्सच्या अॅम्बुलन्सना ऑक्सिजन पुरवतो, असे सांगण्यात आले. गुरुग्रामचे आधार कार्ड नसल्याने ऑक्सिजन देण्यास नकार दिल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Live : केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

रिकाम्या ऑक्सिजन सिलेंडर्सची मोठी रांग लागली असून लोक ऑक्सिजनसाठी ताटकळत उभे असल्याचे चित्र गुरुग्राममध्ये दिसत आहे. शहरात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनाही ऑक्सिजन दिला जाणार नाही, असेही गुरुग्राम प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. आम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही म्हणून आम्ही घरीच उपचार घेत आहोत. पण जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत नाहीत, त्यांना ऑक्सिजन दिला जाणार नाही, असं सांगितलं जात आहे. गरीबांनी कुठं जायचं मग? असा सवालही एका रुग्णाने उपस्थित केला.

हेही वाचा: कोण आहेत अखिल गोगोई? तुरुंगातून भाजपला देतायत टक्कर

गुरुग्राममध्ये सध्या ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. न्यू बॉर्न अॅण्ड चाइल्ड केअर नर्सरी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमधील अनेक नवजात बाळांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. तेथील ऑक्सिजनही काही वेळात संपेल, अशी परिस्थिती आहे. ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही, तर अनेक नवजात बालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत प्रशासनाला कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ ऑक्सिजन पाठवला.

गुरुग्राम हा एनसीआरचा एक भाग आहे, त्यामुळे नव्या आदेशानुसार, जर तुम्ही गुरुग्रामचे नागरिक नसाल, आणि एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज असेल, तरीही तुम्हाला ऑक्सिजन दिला जाणार नाही.