दफन करायला गेले आणि बाळं रडू लागलं!

सूरज यादव
Thursday, 9 July 2020

नर्सच्या बेजबाबदारपणामुळे एक कुटुंब चक्क त्यांच्या बाळाला मृत समजून दफन करायला गेलं होतं.

उदयपुर - डॉक्टरांना देव मानलं जातं. रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचं काम ते करतात. मात्र कधी कधी डॉक्टर, नर्स यांच्या हातून चुका होतात. त्यांच्या बेजबाबदारपणाची मोठी किंमत एखाद्याला चुकवावी लागू शकते. राजस्थानमधील उदयपूर इथं असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्सच्या बेजबाबदारपणामुळे एक कुटुंब चक्क त्यांच्या बाळाला मृत समजून दफन करायला गेलं होतं. सुदैवाने दफन करण्याच्या वेळेलाच बाळ रडल्यानं पुढचा अनर्थ टळला. 

हे वाचा - पॉल बनून महाकाल मंदिरात पोहोचला होता विकास दुबे

राजस्थानमधील उदयपूर इथल्या गोगुंदामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोग्य केंद्रात ललिता नावाच्या गर्भवती महिला प्रसुतीवेदना सुरु झाल्या होत्या. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून ती रुग्णालयात दाखल झाली होती. तिथं तिची प्रसुती झाल्यानंतर नर्सने नवजात बाळाची तपासणी केली. त्यावेळी नर्सने बाळाचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. याची माहिती संबंधित महिलेच्या नातेवाईकांना देण्यात आली. नर्सने बाळाला एका पॉलिथिनमध्ये पॅक केल. त्यानंतर नर्सने त्याला नातेवाइकांकडे सोपवलं.

हे वाचा - लष्कराचा मोठा निर्णय; जवानांना फेसबुक, इंस्टाग्राम वापरता येणार नाही

नर्सने बाळ मृत असल्याचं सांगितल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. कुटुंबियांनी बाळाचा मृत्यू झाला असे समजून दफन करायला गेले. दफनविधीची तयारी पूर्ण झाली होती. त्याचवेळी बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बाळाचा मृत्यू झाल्याने दु:खी झालेल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर यामुळे हसू फुललं. कुटुंबियांनी त्यानंतर वेळ न घालवता मुलाला पुन्हा रुग्णालयात घेऊन गेले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला बेजबाबदारपणावरून धारेवर धरलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nurse declared the newborn baby dead babys cry before burial