'नायक' नव्हे, 'नायिका'; 19व्या वर्षी झाली एक दिवसाची मुख्यमंत्री

टीम ई सकाळ
Sunday, 24 January 2021

20 वर्षांपू्र्वी 'नायक' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये चित्रपटात एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवल्याची कथा दाखवण्यात आली होती. आता अशाच पद्धतीनं एक दिवसासाठी सृष्टी मुख्यमंत्री झाली. त्याचा खूप आनंद तिला झाला आहे.

हरिद्वार - देशात सध्या उत्तराखंडच्या सृष्टी गोस्वामीची चर्चा सुरु आहे. तिला एक दिवसासाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या एक दिवसाच्या मुख्यमंत्रीपदामुळे ती राज्याची पहिली महिला मुख्यमंत्रीसुद्धा ठरली. अर्थात तिच्याकडे एक दिवस आणि प्रतिकात्मक जबाबदारी सोपवण्यात आली होती. 20 वर्षांपू्र्वी 'नायक' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये चित्रपटात एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवल्याची कथा दाखवण्यात आली होती. आता अशाच पद्धतीनं एक दिवसासाठी सृष्टी मुख्यमंत्री झाली. त्याचा खूप आनंद तिला झाला आहे. 

एक दिवसाच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर विधानसभा सत्रात मुख्यमंत्री म्हणून सरकारच्या विविध विभागांचा आढावा तिने घेतला. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी कामाची माहिती सृष्टीला दिली. तसंच यावेळी तिने काही सूचनासुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावतसुद्धा उपस्थित होते. रविवारी तिच्याकडे जबाबदारी सोपवल्यानंतर दुपारी बैठक घेण्यात आली होती.

हे वाचा - मोदी सरकारच्या योजनेनं करून दाखवलं; देशात मुलींचा जन्मदर वाढला!

महिला सक्षमीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सृष्टीला एक दिवसासाठी मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तिच्याकडे ही जबाबदारी दिली होती. याबाबत बोलताना तिने म्हटलं होतं की, एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाल्यानं खूप आनंदी आहे. उत्तराखंड सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मी त्यांना सूचना सांगेन. विशेषत: मुलींच्या सुरक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश असेल.

मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा मागे नाहीत. मुलींना पुढे जाण्यासाठी आई वडिलांच्या सहकार्याची आणि प्रेरणेची गरज आहे. सृष्टीने जे साध्य केलं आहे त्यामुळे इतर आई वडिलांनासुद्धा त्यांच्या मुलींना पुढे जायला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा मिळेल असं सृष्टीची आई म्हणते. 

हे वाचा - Video: मोदी-ममता एका स्टेजवर, बोलणं तर दूरच एकमेकांकडे पाहणेही टाळलं

सृष्टी रुरकी इथं बीएसएम पीजी कॉलेजमधून बीएससी अॅग्रीकल्चरचं शिक्षण घेत आहे. वडिलांचं गावात दुकान असून आई अंगणवाडी सेविका आहे. आपल्या मुलीला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचे आभार मानले. सृष्टी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत काही योजनांच्या माध्यमातून तिने माहिती घेतली आहे. 

हे वाचा - नेताजींच्या जयंतीनिमित्त मोदींचा लूक चर्चेत; फोटोने मोडला विक्रम

सृष्टीची 2018 मध्ये उत्तराखंडच्या बाल विधानसभेत आमदार म्हणूनही निवड करण्यात आली होती. तर 2019 मध्ये तिने गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशिपसाठी थायलंडमध्ये भारताचं प्रतिनिधीत्वही तिने केलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून सृष्टीने आरंभ नावाची मोहिम चालवत आहे. यामाध्यमातून तिने गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रेरणा देणं आणि त्यांना मोफत पुस्तकं देण्याचं काम करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one day cm shrushti goswami uttarakhand know about her work