
लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केलेल्या चीनचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला. परंतु, चीनच्या कुरघोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत.
लडाखनंतर जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्याचा चीनचा डाव
नवी दिल्ली : लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केलेल्या चीनचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला. परंतु, चीनच्या कुरघोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये अस्थीरता पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. काश्मीरमध्ये शास्त्रास्त्रे, दारूगोळा घुसवण्याच्या सूचना चीनने पाकिस्तानला दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं प्रसिद्ध केलंय.
हिवाळ्यापूर्वी घुसखोरीचा धोका
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. त्यात बहुतांश शस्त्रास्त्रे चिनी बनावटीची आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दलाने घुसखोरी विरोधात उचललेल्या पावलांमुळे सध्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसखोरी अशक्य झाली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने हिवाळा सुरू होण्यापूर्वी काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते. कारण, हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर घुसखोरीचे बहुतांश मार्ग बंद होण्याची शक्यता असते. परिणामी येत्या काही दिवसांत पाकिस्तानातून काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहेत. त्याला चीनकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
हे वाचा - POK वरचा ताबा सोडा; इमरान खान यांना भारताच्या प्रतिनिधीने सुनावलं
अधिकाऱ्यांचे काश्मीर दौरे
चीन आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या या हालचालींचा अंदाज आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर घुसखोरी विरोधातील ग्रीडला मजबूत करण्यात आलंय. लष्कर प्रमुख एमएम नरवाने यांच्यासह बीएसएफचे प्रमुख राकेश अस्थाना, सीआरपीएफचे प्रमुख एपी माहेश्वरी या तिघांनी गेल्या दहा दिवसांत जम्मू-काश्मीरचे दौरे केले आहेत. काश्मीरमधील परिस्थितीचा स्वतंत्र अहवाल संरक्षण मंत्रालयाला देण्यात आला आहे. सध्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
हे वाचा - किम जोंग यांना कोणत्याही अटींशिवाय भेटण्याची तयारी; जपानच्या नवनियुक्त पंतप्रधांनाची इच्छा
वेगळ्या पद्धतीने घुसखोरी
पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि पाकिस्तान लष्कर सध्या वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. सीमेवरून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांशिवाय घुसखोरी करायला लावली जात आहे. त्याकाळात पाकिस्तानकडून सीमेवर फायरिंग बंद केली जाते. शस्त्रास्त्रे वेगळ्या मार्गाने पाठविण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे. त्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे, अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.
Web Title: Pak Trying Terror Plot Kashmir Help China Says Government Sources
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..