आता 'बासमती तांदळा'साठी पाकिस्तान भारताशी लढणार, जाणून घ्या नवा वाद

सकाळ ऑनलाईन
Tuesday, 6 October 2020

भारताने बासमती तांदळासाठी केलेल्या भौगोलिक संकेतांकच्या (जीआय) दाव्याला यूरोपियन यूनियनमध्ये विरोध करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

नवी दिल्ली- काश्मीर आणि सीमावादावरुन भारताकडून अनेकवेळा पराभूत झालेल्या पाकिस्तानने आता नवी खोड काढण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान बासमती तांदळावरुन भारताशी संघर्ष करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने बासमती तांदळासाठी केलेल्या भौगोलिक संकेतांकच्या (जीआय) दाव्याला यूरोपियन यूनियनमध्ये विरोध करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पंतप्रधान इमरान खान यांचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सोमवारी (दि.5) हा निर्णय घेण्यात आला आहे. 

'जियो न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत इंटिलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायजेशनचे (आयपीओ पाकिस्तान) सचिव, तांदूळ निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी (आरईएपी) आणि कायदेशीर सल्लागारांनी भाग घेतला होता. बैठकीदरम्यान आरईएपीच्या सदस्यांनी पाकिस्तान बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा विशिष्टतेचा दावा अनुचित असल्याचे म्हटले. त्यानंतर दाऊद यांनी पाकिस्तान यूरोपियन यूनियनमध्ये भारताच्या अर्जाला विरोध करणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.

हेही वाचा- पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक अधिकारी शहीद

दाऊद यांनी आरईएपी आणि इतर भागधारकांच्या सल्ल्याचे समर्थन केले आणि बासमती तांदळाबाबतच्या त्यांच्या दाव्याचे संरक्षण करण्याचा विश्वास दिला. या वृत्तात म्हटले आहे की, भारताने यूरोपियन यूनियनमध्ये बासमती तांदळावर संपूर्ण स्वामित्वाचा दावा केला आहे. जियो न्यूजने गल्फ न्यूजच्या हवाल्याने म्हटले आहे की, यूरोपियन रेग्यूलेशन 2006 च्या मते, बासमतीला सध्या भारत आणि पाकिस्तानच्या उत्पादनाच्या रुपात मान्यता आहे. 

हेही वाचा- सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षड्यंत्र; 80 हजार फेक अकाउंटचा वापर

दरम्यान, गंगा आणि हिमालयाच्या मैदानी भागात उत्पादित होणाऱ्या बासमतीचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब सारख्या राज्यांत मोठ्याप्रमाणात बासमतीची शेती केली जाते. नुकताच मध्य प्रदेशनेही जीआय टॅगची मागणी केली होती. त्याला पंजाबसह इतर काही राज्यांनी विरोध केला होता. भारत प्रत्येक वर्षी 33 हजार कोटी रुपयांचे बासमती तांदूळ निर्यात करतो. एखाद्या क्षेत्रातील विशेष उत्पादनांना जीआय टॅगने विशेष ओळख मिळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan oppose India application for GI tag on Basmati rice in EU