काँग्रेसच्या सामंजस्यामुळे विधेयक तरले

Parliament-Work
Parliament-Work

नवी दिल्ली - राज्यसभेत आज १२६व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या (अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण मुदतवाढ) मंजुरीवेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व खुद्द अध्यक्षांच्या खुर्चीवरून आलेले काही शेरे व उद्‌गारांमुळे खवळलेल्या काँग्रेसने बहिष्कारास्त्र उगारले आणि एक विधेयकच कोसळण्याची शक्‍यता असलेला अभूतपूर्व पेचप्रसंग ओढवला. काँग्रेसविना पुरेशी सदस्यसंख्या नसल्याने सरकारची चांगलीच भंबेरी उडाली. 

कोणत्याही घटनादुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी एकूण सदस्यसंख्येच्या ५० टक्के व दोनतृतीयांश सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, काँग्रेसच्या बहिष्कारामुळे विधेयकच नामंजूर होण्याची नामुष्की ओढवली. अखेर काँग्रेसने आपला सामाजिक बांधीलकीचा सिद्धान्त जपत बहिष्कार मागे घेण्याचा मोठेपणा दाखविला; तेव्हा कोठे या महत्त्वाच्या विधेयकाचा मार्ग प्रशस्त झाला. रात्री उशिरा या वादप्रसंगातील काही उद्गार कामकाजातून काढून टाकण्याचा निर्णय राज्यसभा अध्यक्षांनी घेतल्याचे समजते.

तुम्ही चाळीसहून जास्त वर्षे सत्तेत होतात आणि तुमच्यात टीका ऐकण्याचाही पेशन्स (सहनशीलता) नाही काय..? ही रनिंग कॉमेंट्री कशाला करता..? तुम्ही टीका करता तर तुम्ही इतरांना ऐकून घेऊ शकत नाही काय? असे प्रश्न अध्यक्षांच्या आसनावरूनच जाहीरपणे विचारले जाताच उपस्थित सुमारे चाळीस काँग्रेस सदस्य खवळले. त्याआधी रविशंकर प्रसाद यांनी ‘अकलेचे सशक्तीकरण’ या विषयावर बोलताना मौलाना आझाद यांचे निधन १९५९ मध्ये झाले. पण, त्यांना ‘भारतरत्न’ १९९२ मध्ये मिळाले. पी. व्ही. नरसिंह राव यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयातही येऊ दिले नाही. याच रावांच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ दिले गेले. परिवार असता तर हेही काम अटलजींच्या सरकारला करावे लागले असते, अशी मुक्ताफळे उधळली. हे ऐकताच मात्र काँग्रेस सदस्यांचा पारा चढला. संतप्त काँग्रेसजनांना शांत करण्याचे प्रयत्न सरकारच्या बाजूने झालेच नाहीत.

भरीस भर म्हणून अध्यक्षांनीही काँग्रेसच्या चार दशकांच्या सत्तेचा उद्धार केल्यावर तर काँग्रेसने बहिष्कारच टाकला आणि सभागृहात एक विचित्र शांतता निर्माण झाली. सदस्यसंख्या नसल्याचे सूचीत करणारी घंटा घणाणू लागली तेव्हा लॉबीत काँग्रेसजन शांततेने चर्चा करीत उभे होते. घटनादुरुस्ती विधेयकाला पुरेशी सदस्यसंख्या नसल्याचे लक्षात आले तेव्हा मात्र सरकारच्या गोटात धाकधूक व चलबिचल सुरू झाली. सुरुवातीला काँग्रेस नेते बहिष्कारावर ठाम होते. पण, गुलाम नबी आझाद यांनी सामंजस्य दाखवीत सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने महत्त्वाचे हे विधेयक असल्याने सभागृहात परतण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस सदस्य परतताच जिवात जीव आलेले प्रसाद धावतच त्यांच्याकडे गेले व त्यांनी त्यांचे व आनंद शर्मा यांचे मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com