ममतांना मोठा धक्का; बड्या नेत्यासह 5 हजार कार्यकर्ते भाजपच्या गळाला?

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 1 January 2021

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकानंतर एक भाजप झटके देत आहे. तृणमूल काँग्रेससोडून भाजपमध्ये सामिल झालेले सुवेंदु अधिकारी यांनी शुक्रवारी सांगितलं की त्यांचे बंधू आणि तृणमूलचे नेता सौमेंदू अधिकारी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सौमेंदू यांना कोन्टाई नगरपालिका प्रशासक पदावरुन हटवण्यात आले होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ!

सुवेंदू यांनी पूर्व मेदिनीपूरमध्ये एका बैठकीत सांगितलं की सौमेंदू आणि तृणमूल काँग्रेसचे 5 हजार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामिल होतील. सुवेंदू यांनी तृणमूल काँग्रेसवर टीकाही केली. लवकरच तृणमूल काँग्रेस नष्ट होऊन जाईल, असा दावा त्यांनी केला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवासाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की माझा छोटा भाऊ सौमेंदू कोन्टाईमध्ये शुक्रवारी भाजपमध्ये सामिल होईल. 

सौमेंदू यांनी गुरुवारी म्हटलं होतं की, प्रत्येक घरात कमळ खुलेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, तेही आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपमध्ये सामिल होतील. दोन दिवसात त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यासोबत तृणमूलचे 5000 कार्यकर्ते असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

सफाई कर्मचारी ते पंचायत समिती अध्यक्ष; आनंदवली यांचा संघर्षमय प्रवास!

दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाची गरमागरम हवा आतापासून वाहण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला धडा शिकवण्याचा मानस भाजपचा आहे. त्यासाठी कंबर कसून आतापासूनच भाजप कामाला लागला आहे. शक्य तितक्या पातळ्यांवर आतापासूनच टीएमसीला धक्के देण्याचे डावपेच भाजपने आखलेले आहेत. याआधी तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाला मोठा हादरा बसला. यानंतर तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paschim bangal mamta banarjee suvendu adhikari brother will join bjp