बिग बींची 'कॉलर ट्यून' डोक्यात जाते; थेट हायकोर्टात याचिका दाखल

टीम ई सकाळ
Thursday, 7 January 2021

कोणालाही फोन केला की ऐकू येणारी कॉलर ट्यून 'नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं' ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आहे. 

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंत देशात केंद्र सरकारने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. लॉकडाऊन केल्यानंतरही लोकांनी काळजी घ्यावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मेसेज दिले. त्यामध्ये फोन केल्यानंतर प्रत्येकाला कॉलर ट्यूनच्या माध्यमातून काळजी घेण्यास सांगण्यात आले. कोणालाही फोन केला की ऐकू येणारी कॉलर ट्यून 'नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं' ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आहे. 

कॉल लावताच सर्वात आधी हा आवाज कानावर पडतो. कोरोनाच्या या कॉलर ट्यूनवरून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाली आहेत. दरम्यान, आता ही ट्यून बंद करावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका कोणी दाखल केली हे समोर आलेलं नाही. 

हे वाचा - कोरोना लस मिळण्यासाठी मदत करेल Co-WIN ऍप; जाणून घ्या कसं काम करतं

याआधी एका ट्विटर युजरनं अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला होता की, कॉलरट्यून बंद कधी केली जाणार आहे. त्यावर बिग बींनी म्हटलं होतं की, माझं काम व्हॉइस ओव्हर देणं इतकंच असतं. कोणती जाहिरात किंवा कॉलरट्यून कधी सुरु आणि बंद करायची हे माझ्या हातात नसतं. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 

अमेरिकेत समर्थकांच्या गोंधळानंतर ट्रम्प नरमले; म्हणाले, सत्तेच्या...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यास आणि मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करायला सांगण्यासाठी ही कॉलर ट्यून सुरू केली होती. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून ही कॉलरट्यून सुरु असून अद्याप बंद केलेली नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PIL filed Delhi hc remove caller tune on COVID19 in big b voice