आझाद यांना निरोप देताना मोदी भावूक; शरद पवारांकडूनही कौतुक

Narendra modi
Narendra modi

नवी दिल्ली - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावुक रूप पाहायला मिळाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

जम्मू-काश्‍मीरमध्ये २००६ साली गुजराती पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला असताना आझाद यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करताना मोदींना अश्रू अनावर झाले. काही क्षण निःशब्द झालेल्या पंतप्रधानांनी आझाद यांना खुणेनेच सॅल्यूट केला. यानंतर आझाद यांनी देखील त्यांचे विचार सभागृहासमोर मांडले, हल्ल्याचा तो क्षण आठवताना आझाद यांचा आवाज कातर झाला होता.‘‘भारतीय मुसलमान असल्याचा मला अभिमान वाटतो’’ असे सांगतानाच, ‘‘ हे अल्लाह, या देशातून दहशतवाद संपू दे’, अशीही साद देखील त्यांनी परमेश्‍वराला घातली. वरिष्ठ सभागृहाचा निरोप घेताना आझाद हळवे झाले होते.

राज्यसभेतून निवृत्त होणारे आझाद यांच्यासह शमशेरसिंह मनहास, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद दवे यांना आज निरोप देण्यात आला. यानिमित्ताने पंतप्रधान सकाळी साडेदहा ते दुपारी एक असे सुमारे अडीच तास वरिष्ठ सभागृहात होते. अध्यक्ष वेंकय्या नायडू व उपाध्यक्ष हरिवंश यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, रामगोपाल यादव, काँग्रेस उपनेते आनंद शर्मा, नवनीत कृष्णन, प्रसन्न आचार्य, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी सर्वपक्षीय नेत्यांनी आझाद यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल, त्यापेक्षाही संसदीय परंपरांच्या पालनाबद्दल त्यांना वाटणाऱ्या जिव्हाळ्याबद्दल गौरवोद्गार काढले. आझाद यांच्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून येणाऱ्या नेत्यासाठी त्यांचा वारसा सांभाळणे फार कठीण असेल असे पंतप्रधानांनी सांगताच बहुतांश सदस्यांच्या नजरा काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे वळल्या. 

काश्‍मीरमधील २००६ च्या हल्ल्यात गुजरातचे आठ पर्यटक मारले गेले व अनेक जण जखमी झाले होते. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला आझाद यांनी केलेल्या मदतीच्या आठवणीने मोदी भावविवश झाले. त्या हल्ल्यानंतर पहिला फोन मुख्यमंत्री आझाद यांचा आला व फोनवर ते आपले आप्तस्वकीय गेल्याप्रमाणे रडत होते असे सांगून मोदी निःशब्द झाले. ते म्हणाले की मृतदेह व जखमींना घेऊन येण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे विमान मिळावे यासाठी मी तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. रात्रीची वेळ होती तरी त्यांनी मला सर्वतोपरी साहाय्य करण्याची भूमिका घेतली. त्या रात्री आझाद पुन्हा विमानतळावर पोहोचले व त्यांनी पुन्हा आपल्याशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन करून, सारे जण गुजरातला पोहोचले का, अशी विचारणा त्यांनी केली. "सत्ता येते व जाते पण ती कशी पचवावी...'' असे म्हणताना निःशब्द मोदींनी आझाद यांच्याकडे पाहात सलाम केला.

ते म्हणाले की एक मित्र म्हणून मला आलेल्या अनुभवांच्या आधारे आझाद यांचा मी आदर करतो. तुम्ही निवृत्त होत नाही आहात. तुमच्यातील सौम्यता, नम्रता व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही. मुळात मीच तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही. तुमच्या अनुभवांचा लाभ देशाला मिळत राहिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

केवळ चार वेळा रडलो
आझाद म्हणाले की गुजरात पर्यटकांवरील हल्ल्या व्यतिरिक्त आयुष्यात मी केवळ ४ वेळाच जोराने रडलो होतो. इंदिरा गांधी, संजय गांधी व राजीव गांधी यांचे मृत्यू व १९९९ मध्ये ओडिशातील सुनामी नंतर. त्या अतिरेकी हल्ल्यानंतर मी जेव्हा विमानतळावर पोहोचलो तेव्हा ज्यांचे आईवडील हल्ल्यात मृत्यूमुखी पडले ती बालके मला येऊन बिलगली तेव्हा मी मोठ्याने रडलो होतो. प्रत्येक ईदला मला कॉंग्रेस अध्यक्षा व पंतप्रधान मोदी यांचे न चुकता फोन येतात असे सांगून आझाद म्हणाले की सभागृहात तिखट वादावादी झाली तरी मोदींनी व्यक्तिशः त्याचे वाईट वाटून घेतले नाही असाही त्यांनी अनुभव सांगितला. 

समस्या समजून घेतात ः पवार
संसदीय कामकाज मंत्री म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचा इतका विश्‍वास प्राप्त करणारे, विरोधी पक्षीय नेत्यांशी बोलून त्यांच्या समस्या समजावून घेणारे, आझाद यांच्याशिवाय कोणीही मंत्री आपण आपल्या अर्धशतकाच्या राजकीय कारकिर्दीत दुसरे पाहिलेले नाहीत अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला. ते म्हणाले की सर्वच्या मंत्रालयांच्या संसदीय स्थायी समित्यांवर काम करणारे आझाद हे सध्याचे एकमेव संसद सदस्य असतील. काश्‍मीरहून आलेले आझाद १९८२ मध्ये विदर्भातील वाशीमसारख्या दुर्लक्षित व विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या जिल्ह्यातून प्रथम खासदार झाले. त्या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचे, तेथील शिक्षण, आरोग्य, शेती यासह सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. आझाद पुन्हा राज्यसभेवर येतील व त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाला मिळेल अशाही शुभेच्छा पवार यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com