राष्ट्रपतींनी चीनला नाव न घेता दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

कोरोनासारख्या सर्वांत कठीण आव्हानाचा मुकाबला जागतिक समुदायाने आज एकजूट होऊन करण्याची आवश्‍यकता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं.

नवी दिल्ली - कोरोनासारख्या सर्वांत कठीण आव्हानाचा मुकाबला जागतिक समुदायाने आज एकजूट होऊन करण्याची आवश्‍यकता आहे. नेमक्‍या त्याच वेळेला आमच्या शेजाऱ्याने अत्यंत चलाखीने आपल्या विस्तारवादी कारवाया करण्याचे दुःसाहस केले. भारताचा शांततेवर विश्‍वास असला तरी कोणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला भारताकडून सणसणीत प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज चीनचे नाव न घेता दिला. भारताच्या आत्मनिर्भरतेचा अर्थ जागतिक बाजारपेठेशी जोडून घेताना स्वतः अर्थ-सक्षम होणे आहे. जगापासून फटकून राहणे नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी गलवान खोऱ्यांतील चीनच्या कुरापतीमध्ये देशासाठी हुतात्मा झालेल्या शूरवीरांचा गौरव केला, त्याचबरोबर कोरोना योद्ध्यांबद्दलही गौरवोद्गार काढले. राष्ट्रपतींनी कुरापतखोर चीनचा नामोल्लेख केला नाही तरी गलवान खोऱ्याचा स्पष्ट उल्लेख करून त्यांनी शेजाऱ्याला इशारा दिला. ते म्हणाले की देशाच्या सीमांचे रक्षण करताना भारत मातेच्या शूर सैनिकांनी प्राणार्पण केले. गलवानमध्ये बलिदान दिलेल्या त्या शूरवीरांना सारा देश आज सलाम करत आहे. त्यांच्या कुटुंबीयांबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार कृतज्ञता आहे. आम्हाला आमच्या सीमांचे व देशांतर्गत भागांचे रक्षण करणारे लष्कर, पोलिस, निमलष्करी दलांचा अभिमान आहे. 

हे वाचा - 'वन नेशन वन राशन कार्ड' ची लालकिल्ल्यावरून घोषणा?

राष्ट्रपती म्हणाले -
- अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माणाचे भूमीपूजन झाले व 
देशवासीयांनी गौरवाचा अनुभव घेतला. 
- कोरोना संकटातील भारतीयांच्या धैर्याचे जगाकडून कौतुक. 
- स्वबळावर लढाई करतानाच भारताकडून इतरांनाही मदत. 
- डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय व सफाई कर्मचारी या कोरोना योद्ध्यांनाही सलाम. 
- या संकटात कोणीही उपाशी राहू नये यासाठी विशेष योजनेत ८० कोटी लोकांना मोफत रेशन योजनेचा लाभ. 
- कृषी क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणांना सुरवात झाली आहे. 

हे वाचा - RBI केंद्र सरकारला देणार 57 हजार 128 कोटी; प्रस्तावाला मंजुरी

आता अर्थव्यवस्थेलाही प्राधान्य 
कोरोना संकटाचे संधीत रूपांतर करून विशेषतः छोटे व्यावसायिक-उद्योजक व शेतकरी यांना संकटातून बाहेर काढून अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करण्यास आपल्याला आता प्राधान्य द्यायचे आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेचा अर्थ स्वतः सक्षम होणे आहे. जगापासून दूर रहाणे नव्हे असे राष्ट्रपती म्हणाले. ‘भारत वैश्‍विक बाजारपेठेत सामील होतानाच स्वतःची वेगळी ओळखही कायम ठेवेल,’ अशा शब्दांत त्यांनी भारताला विश्‍व व्यापार कराराचा बागुलबुवा दाखविणाऱ्या चीनला फटकारले. सर्वांच्या सुखासाठी व ‘विश्‍वमंगलतेसाठी’ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्‍यन्तु, मा कश्‍चित्‌ दु:खभाग्‌ भवेत् अशी प्रार्थना करून आपल्या संबोधनाचा समारोप केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ram Nath Kovind speech on independence day